आळंदीत आलेल्या वारकऱ्यांची पाऊले चालती सिध्दबेटाकडे… — चला एक पाऊल सिध्दबेटाकडे या मोहिमेचे वारकऱ्यांकडून कौतुक…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र आळंदी मध्ये लाखो वारकऱ्यांचे आगमन होत आहे, अनेक वारकऱ्यांना सिध्दबेट प्रचलित नव्हते परंतु सोशल मीडियावरील चला एक पाऊल सिध्दबेटाकडे या जनजागृती मोहिमेमुळे अनेक वारकरी पवित्र सिध्दबेटाकडे वळाली आहे.

        त्यामुळे सिध्दबेटाचे महत्व आणि महती जानून सिध्दबेटाच्या छत्रछायेखाली हरिपाठ आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण करण्याचे भाग्य मिळालेचे आत्मिक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे, आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून तसेच विविध सामाजिक संस्थांनच्या माध्यमातून सिध्दबेटाच्या विकासकामांवर येणारा वारकरी भाविक समाधानी आहे.

        आता चला एक पाऊल सिध्दबेटाकडे या माध्यमातून नव्याने मी येथे भेट दिली असे परभणी येथील वारकरी महादू जवळेकर यांनी सांगितले. यावेळी येथे नव्याने वृक्षारोपण झालेले आहे. वारकरी साधक मंडळी येथे ज्ञानेश्वरी चे भागवताचे, तुकाराम गाथेचे वाचन करत आहेत.ही भुमी साधनेसाठी खरी आहे. ऊर्जा व प्रेरणा मिळण्याचे हे स्थान आहे. नगरपरिषदेच्या पुढाकाराने सुरक्षारक्षक कर्मचारी येथे नेमल्याने येथे स्वच्छता आहे. त्यामूळे परिसर सुंदर झाला आहे.याबद्दल आळंदी नगरपरीषदेचे त्यांनी आभार मानले.

      यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले की लवकरात लवकर भाविकांसाठी बसण्यास लोखंडी व दगडी आसनव्यवस्था केली जाणार आहे, येथील दगडी ट्रकची डागडुजी आणि कडेला सोलर पथदिवे बसविण्यात येणार आहेत वारकरी संप्रदायातील साधकांसाठी अभ्यासिका व सुरक्षा रक्षकांसाठी खोलीचे काम केले जाईल. प्रवेश द्वाराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे, फळझाडे आणि तुळशीचे रोपण केले जाणार आहे सिध्दबेटाचे पावित्र्य राखुन संतांच्या वास्तव्याचे दर्शन घडविणारी भित्तिचित्रे साकारली जाणार आहे.