Home Social परिश्रमातंर्गत शून्यातून केले यश संपादन,जिद्दीने पोलीस दलात मिळविले स्थान!.. — दीपस्तंभ...

परिश्रमातंर्गत शून्यातून केले यश संपादन,जिद्दीने पोलीस दलात मिळविले स्थान!.. — दीपस्तंभ वाचनालयातील विद्यार्थ्यांचा यशोगौरव,गडचिरोली पोलीस दलात निवड!…

     राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

       अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द,चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर यश संपादन करता येते,याचा प्रत्यय दीपस्तंभ वाचनालय भरनोली येथे अभ्यास करून दोन विद्यार्थ्यांनी दिला आहे.

        त्यांच्या या यशस्वी वाटचालीचा गौरव गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.

           गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ व कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमांतर्गत दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सशस्त्र पोलीस दुरक्षेत्र भरनोली येथे दीपस्तंभ वाचनालयात हा सन्मान सोहळा पार पडला.

       यावेळी रुपेश नैताम (रा. शिवनी, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली) यांनी १५० पैकी ११३ गुण मिळवून,तसेच गिरीधर बंजार (रा.पलसगड, ता.कुरखेडा,जि.गडचिरोली) यांनी १५० पैकी १२५ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.या दोघांची गडचिरोली जिल्हा पोलीस दलात निवड झाल्याने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

      अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे जाता येत,यशस्वी होता येत हे सदर युवकांनी दाखवून दिले आहे.दीपस्तंभ वाचनालयात नियमित अभ्यास,योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले. 

            “ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते,” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

       या प्रसंगी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दीपस्तंभ वाचनालयाचा लाभ घ्यावा आणि पोलीस विभागाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल,असेही आवाहन करण्यात आले.

      जया उपक्रमाचे आयोजन गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे,अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील तसेच केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

        कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक नरेश मारवाडे,पीएसआय सयाम,तसेच सशस्त्र पोलीस दुरक्षेत्र भरनोली येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.याशिवाय तलाठी नावेद शेख,पोलीस पाटील कमलेश झोडे,मुख्याध्यापक महेश ताराम,सामाजिक कार्यकर्ते विक्रम पालीवाल आदी मान्यवरांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

      या सन्मान सोहळ्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून,स्पर्धा परीक्षांकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.