मारेगाव येथील प्रलंबित MIDC ची समस्या निकाली काढण्यासाठी व कापूस पिकाला १२ हजार रुपये भावाचा मुद्दा विधानसभेत मांडण्यासाठी,युवा सामाजिक कार्यकर्ते रोहन आदेवार यांचे आमदार रोहित पवार यांना निवेदन…

   सूरज झोटिंग 

तालुका प्रतिनिधी मारेगाव

          यवतमाळ जिल्ह्यातंर्गत मारेगाव शहरा पासुन दोन किमी अंतरावर घोन्सा रोडवर एम.आय.डी.सीचा फलक गेल्या 30 वर्षापासून लागला आहे.

         मात्र लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीमुळे अजून पर्यंत तिथे औद्योगिक प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही.त्यामुळे एमआयडीसीच्या जागेच्या क्षेत्राचे नेमके काय झाले? व एमआयडीसी अंतर्गत औधोगीक समस्या निकाली काढण्यासंबंधाचे कुठे घोडे अडले?हा प्रश्न आजही अधांतरीच आहे.

         यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातंर्गत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत.याचबरोबर मारेगाव तालुक्यात अनेक उद्योग आणून बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत कुणीही बोलायला तयार नाहीत.

               या तालुक्यात शेती शिवाय दुसरा पर्याय नाही.विकासाच्या बाबतीत मागासक्षेत्र म्हणून या तालुक्याची ख्याती आहे.गेल्या तीस वर्षापूर्वी शासनाने तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघावा म्हणून येथील घोन्सा रोडवर एम.आय.डी.सी.चा फलक लावला होता. 

        मात्र,हा फलक बेरोजगारांना खुणावण्याखेरीज दुसरे काहीच करतांना दिसत नाही.कमीतकमी खासदार व आमदार सारख्या जबाबदार लोकप्रतिनिधींना बेरोजगारांच्या समस्यांबाबत संवेदनशील करतानाही तो फलक दिसत नाही.मग या एमआयडीसी फलकाचे दर्शन दररोज कशासाठी?हा मुद्दा महत्वपूर्ण आहे.

          परत्वे यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.मात्र,या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होताना दिसत आहेत.दिवसेंदिवस कापूस पिकाचा खर्च वाढत असताना,दरवर्षी भाव तोच-तो राहतो आहे.कापसाचा प्रति क्विंटल सात हजार रुपये भाव असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे.

          कमीत कमी पर क्विंटल बारा हजार रुपये भाव कापसाला मिळावा,या अनुषंगाने गंभीर बाब लक्षात घेता,”आमदार रोहीत पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडावा या उद्देशाने,विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे सामाजिक कार्यकर्ते रोहन आदेवार यांनी निवेदन दिले आहे.

           आणि मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या समस्यांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून त्यांना धीर द्यावा अशी विनंती पुर्वक अपेक्षा व्यक्त केली आहे.

        आमदार रोहीत पवार यांनी निवेदन स्वीकारले असून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.