Home Social आळंदीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न… — जय गणेश,...

आळंदीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न… — जय गणेश, धर्मराज व शिवतेज गणेश मंडळाचे देखावे आकर्षणाचे केंद्रबिंदू…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तीभाव आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आळंदीत गणेश विसर्जन मिरवणूक थाटामाटात पार पडली. शहरातील प्रमुख मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून करण्यात आले.

         मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांच्या गजरात, लेझीम-झांज पथक, पारंपरिक नृत्य, तसेच आकर्षक समाजप्रबोधनपर सजीव देखावे हे विशेष आकर्षण ठरले. टाळ-मृदंगाच्या साथीने हरिनाम गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले. महिला मंडळींचाही या उत्स्फूर्त सहभाग होता.

         या विसर्जन मिरवणुकीत जय‌ गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून घराचे घरपण हरवलय हे समाजातील वास्तव सत्य देखाव्याच्या माध्यमातून साकरले होते गेली अनेक वर्ष जय गणेश प्रतिष्ठान अध्यक्ष गोविंदा कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली असे समाजप्रबोधन पर देखावे साकारत आहे.

        तसेच शिवतेज मित्र मंडळ यांनी गोव्यातील शिमगा उत्सवातील सांकृतिक परंपरा असलेला देखावा साकरला. धर्मराज ग्रुपने आदिशक्तीचा जागर हा पौराणिक संभळ वादन हा देखावा साकरला तर जय गणेश ग्रुपने अध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा ज्योतिर्लिंग व महाकालेश्वर आरती हा आकर्षक व नेत्रदीपक देखावा साकरला होता.

          दत्तनगर प्रतिष्ठान, एकत्व मित्र मंडळ, व्यापारी तरुण मंडळ, शिवस्मृती प्रतिष्ठान, सुवर्णयुग प्रतिष्ठान, कै.बाबाशेठ मुंगसे प्रतिष्ठान, राजमुद्रा प्रतिष्ठान, मुक्ताईनगर प्रतिष्ठान, श्री.दत्तनगर ग्रुप, ज्ञानराज मित्र मंडळ, एकलव्य प्रतिष्ठान या गणेश मंडळांनी ढोल लेझीम-झांज पथकांच्या गजरात मिरवणूक काढली.

         आळंदी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने वाहतूक, सुरक्षाव्यवस्था आणि विसर्जनाच्या ठिकाणी स्वच्छतेची काटेकोर व्यवस्था केली होती. कृत्रिम हौदात पर्यावरणपूरक विसर्जनास प्राधान्य देण्यात आले. गणेश भक्तांनी विघ्नहर्त्याला निरोप देताना “पुढच्या वर्षी लवकर या” अशी प्रार्थना करत उत्साहात बाप्पाला निरोप दिला.