Home सांस्कृतिक माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी मानाच्या अश्वांचे अंकलीहून प्रस्थान…

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी मानाच्या अश्वांचे अंकलीहून प्रस्थान…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : श्री. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान अंकली जि बेळगांव येथून रविवारी (दि.८) हरिनाम गजरात झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान असलेल्या माऊलींच्या अश्वाचे शितोळे, अंकली (ता.चिकोडी जि.बेळगांव) येथून प्रस्थान झाले.

        माऊलींच्या सोहळ्यातील मानाचे अश्व अंकली ते आळंदी हा ११ दिवसांचा पायी प्रवास करुन दि.१८ जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीत दाखल होतील. गुरुवार (दि.१९) जून रोजी आळंदी मंदिरातून श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून प्रस्थान होणार आहे.  

         आषाढी वारी साठी ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्व प्रस्थान सोहळ्यास श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार, युवराज विहानराजे शितोळे सरकार, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, पालखी सोहळ्याचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, माऊली ग्रुपचे ज्ञानेश्वर गुळुंजकर, अजित मधवे, शंकरराव मा.कुऱ्हाडे आदीसह वारकरी उपस्थित होते.

          सन १८३२ मध्ये श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा सुरु झाला. अगदी तेंव्हा पासून श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व व देवाला रात्री मुक्कामाचे ठिकाणी तंबू देण्याची परंपरा आहे. दि.१९ जून रोजी आषाढी पायी वारी पालखी सोहळा आळंदीतून पंढरीकडे प्रस्थान करेल.

         अंकली येथील शितोळे सरकारांच्या राजवाड्यात अश्वांचे विधिवत पूजन, परंपरांचे पालन करीत धार्मिक पूजा विधी झाल्यानंतर श्रीमंत शितोळे सरकार यांचे नियंत्रणात पूजना नंतर नगर प्रदक्षिणा झाल्यावर या अश्वाचे आळंदीकडे हरीनाम गजरात प्रस्थान झाले.