भोरला,बिन साखरेचा चहा!… — दूषित पाणीपुरवठा केल्याने भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने मानले पालिका प्रशासनाचे आभार… — गांधीगिरी करत दिले गुलाबाचे फूल…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

भोर ; भोर शहराला मागील काही दिवसांपासून गाळ मिश्रित गढूळ (बिन साखरेचा चहा) आणि दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत आहे. दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पार्श्वभूमीवर आज (दि.७) रोजी भोर शहर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांना आभाराचे पत्र दिले दिले असून गांधीगिरी करत गुलाबाचे फुल दिले आहे. भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष राजेंद्र गुरव, ठाकरे गटाचे शिवसेना भोर शहर प्रमुख नितीन सोनावले, भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या शिष्टमंडळाने पालिकेत येऊन मुख्याधिकाऱ्यांना आभाराचे पत्र दिले आहे. मात्र यावेळी आंदोलक येण्याची कुणकुण लागताच मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी पालिकेतून काढता पाय घेतला असून इतर पालिका अधिकाऱ्यांनी आभाराचे पत्र तसेच गुलाब पुष्प स्वीकारले आहे. 

      यावेळी भाजपाचे राजेंद्र गुरव, शिवसेनेचे नितीन सोनावले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र शिंदे ,गणेश साळेकर, धुमाळ, पालिका अधिकारी महेंद्र बांदल, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.

       शहराला दूषित पाणी पुरवठा या संदर्भात सर्व पक्षीय नेत्यांनी सर्वप्रथम आवाज उठवला होता. यानंतर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी योग्य ती उपाय योजना करण्याचे स्थानिक प्रतिनिधीला कळवले. मात्र अद्यापही दूषित आणि गाळ मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील कॉंग्रेस विरोधक एकवटले असून गांधीगिरी करत आंदोलन केले आहे.