दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या गटनेता पदी नगरसेवक सचिन गिलबिले यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली.
यापूर्वी त्यांनी आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम केले असून, त्यांच्या अनुभवाची दखल घेऊनच पक्षाने त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. निवडीनंतर आमदार महेश लांडगे व आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी सचिन गिलबिले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत भाजपची भूमिका अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडीनंतर बोलताना सचिन गिलबिले यांनी पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. उपनगराध्यक्ष पदावर काम करताना मिळालेला अनुभव गटनेता पदावर निश्चितच उपयुक्त ठरेल. नगरपरिषदेत पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभारासाठी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निवडीचे स्वागत भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केले असून, गटनेता निवडीमुळे नगरपरिषदेत भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



