बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपुर भागातील केळी उत्पादक शेतकऱ्याची नाराजी. केळी पिकाचे दर कमी झाल्याचे संकट कोसळले आहे. गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात अभूतपूर्व घसरण झाली असून प्रतिकिलो केळीला अवघे तीन ते पाच रुपये एवढाच भाव मिळत आहे. मागील तीन वर्षांतील हा सर्वात नीचांकी दर असल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
एकरी उत्पादन खर्च तब्बल दीड ते पावणे दोन लाख रुपये इतका असताना, प्रत्यक्ष उत्पन्न केवळ 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे.
पूर्वी निर्यातक्षम बॉक्स पॅकिंग मालाला 20 ते 28 रुपये किलो दर मिळत होता, तर देशांतर्गत बाजारातही 10 रुपयांच्या खाली दर जात नव्हता. मात्र, या हंगामात भाव कोसळल्याने उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही, अशी स्थिती आहे.
शेतकऱ्यांच्या मते, सध्या केळीचा उत्पादन खर्च एकरी दीड ते पावणेदोन लाख रुपये झाला आहे. सरासरी 20 ते 25 टन उत्पादन मिळते. मागील महिन्यात 27 रुपये दर मिळाला, पण आता तो तीन ते पाच रुपयांवर आला आहे. वीस रुपये दर मिळाल्यास नफा नाही झाला तरी खर्च तर वसूल होईल, शासनाने यावर ठोस तात्काळ उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
दोन वर्षांपूर्वी पर्यंत केळीच्या रोपांसाठी काही निवडक कंपन्याच उपलब्ध होत्या; परंतु आता नवीन कंपन्यांची वाढ झाल्याने लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढले आणि उत्पादन जास्त झाल्याने बाजारात मागणी नसल्यामुळे भाव कोसळले. राज्य सरकार आणि कृषी विभागाने केळी उत्पादकांसाठी तातडीने आधारभाव जाहीर करावा, अन्यथा पुढील हंगामात शेतकरी केळीची लागवड टाळतील, अशी शक्यताही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
केळीचे भाव कमी झाल्यामुळे नरसिंहपूर परिसरात शेतकरी राज केळीचे पीक ट्रॅक्टरच्या साह्याने मोडू लागलेला आहे.



