बाबासाहेबांची उर्जायनी: त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर…

         भारत देशात महिलांचे एक वेगळेच महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांचा एक वैशिष्ट्य पूर्ण इतिहास लिहीला गेला आहे. जो की येणाऱ्या पिढीला तो प्रेरित करीत राहील. अस म्हणतात की,प्रत्येक पुरुषांच्या उत्कर्षामागे एक स्त्री असते.

          जसे छत्रपती शिवरायांना घडवणारी राजमाता जिजाऊ, महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्यात सक्रीय सहभागी होवून शैक्षणिक क्रांती घडविणारी क्रांती ज्योती सावित्री. तर जीवनभर त्याग सोसून डॉ. बाबासाहेबांना यशाच्या शिखरावर पोहोचवणारी बाबासाहेबांची उर्जायनी त्यागमुर्ती रमाई. विशेष या तिनही महान माता एकामागोमाग जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात पंधरा पंधरा दिवसांच्या अंतराने जन्माला आल्या हा एक मोठा योगायोग म्हणावा लागेल.

आज ७ फेब्रुवारी म्हणजेच माता रमाई यांचा जन्म दिवस आपण साजरा करीत आहोत.

         ७ फेब्रुवारी १८९८ रोजी रमाईचा एका छोट्या गरीब धुत्रे (वलंगकर) कुटुंबात जन्म झाला. पिता भिकू धुत्रे आणि आई रुक्मिणी या दांपत्यास चार मुले,त्यात तीन मुली आणि एक मुलगा होता. त्यात रमा सर्वात मोठी होती. त्यामुळे आईच्या प्रत्येक कामात ती मदत करायची. तिला आई खुप जीव लावायची आणि लाडाने तिला ‘रामू’ म्हणायची. रमावर लहानपणापासूनच दुःखाचे डोंगर कोसळत होते. कष्ट करून जगविणारा बाप भिकू काळाने हिरावून नेला होता. पूर्ण धुत्रे कुटुंबातील वटवृक्षच जणू उन्मळून पडला होता. पण रुक्मिणी च्या भावाने हे कुटूंब मुंबईला आणले होते. काही दिवसात आई गेली. आणि डोक्यावरील आता छप्परच उडाले होते. तिच्या दुःखाला पारावार नव्हता. तिचे लग्नाचे वय झाले होते, पण आई आणि वडिलांना रमाचे लग्न पाहण्याचे भाग्य लाभले नाही.

        सन १९०८ साल उजाडलं.नवू वर्षाची रमा भीमाची नवरी झाली. रामजी सुभेदारांची सुन झाली.पण तिला माहीत नव्हतं की तिची रेशीम गाठ एक तुफानाशी बांधली गेली होती. ती एका सूर्याची सावली झाली होती. ते त्या सूर्यालाही आणि त्या सावलीलाही अज्ञात होत.

           रमा आता रमाबाई आंबेडकर झाली होती. संसाराचा भार व्यवस्थीतरित्या ती सांभाळत होती. त्या घराचे घरपण भिमाई म्हणजे भीमाची आई हिच्या जाण्याने हरपून गेले होते. पण नववधू रमाने आंबेडकर घराण्याला घरपण आले होते. घरधनीणची जागा भरुन निघाली होती. घरातील सभासदात एक नवीन सभासदाची भर पडली होती. घरात सासरे सुभेदार, त्यांची बहिण म्हणजे भीमरावाची आत्या मिराबाई होती. ती अपंग होती.मोठे बंधू आनंदराव आणि त्यांची फत्नी लक्ष्मी होती. तसेच जिजाबाई भीमरावाची सावत्र आई होती. अस मोठे आंबेडकर कुटुंब एकत्र नांदत होते. मिराबाई रमाला आईचे प्रेम द्यायची. तर रमाही मिराबाईची चांगली सोय घ्यायची. एवढेच नाही तर सर्व कुटुंबाची रमा सोय घ्यायची. म्हणून ती रमा नाही तर रमाई झाली होती.भीमरावांनी रमाईला साक्षर केले. हळूहळू ती वाचायला शिकली. तिला सुभेदारांनी केळूसकर गुरुजींनी दिलेले ‘बुद्ध चरित्र’ वाचण्यासाठी दिले.

          सन १९१२ साल उजाडलं आणि भिमराव आणि रमाई आईवडील झाले. त्याच नाव यशवंत ठेवण्यात आले. संसाराला आनंदानचे उधाण आले होते. पण मृत्यूने तिची पाठ सोडली नव्हती. सन १९१३ मध्ये सुभेदार गेले. हा बहरलेला वृक्ष पुन्हा कोमेजला. आंबेडकर कुटुंब शोकसागरात बुडाले होते.

           काही महिने गेले आणि भीमराव आंबेडकरांना अमेरिकेत जाण्याची संधी आली. त्यावेळेसच रमाई दुसऱ्यांदा गरोदर राहिली. एकीकडे परदेशदौरा आणि दुसरीकडे रमाईला ह्या स्थितीत सोडून जाण अवघड होते. पण रमाईने आपल काळीज घट्ट केले. एकाकीपणा वर मात केली. आणि भीमराव आंबेडकर कोलंबियाला गेले. इकडे रमाई संसाराचा गाडा ओढत होती. सुभेदार होते तेंव्हा ती निर्धास्त होती.आता तिला प्रत्येक गोष्टीला सामोर जावे लागत होते. संसाराचा गाडा ओढताना तिला शेण थापावे लागले.गोवऱ्या करणे, सरपण आणण्यासाठी लांब लांब जावे लागले. तिचे खूप हाल झाले. परिस्थिती तिचा सूड घेत होती.अशातच रमेश नावाचा मुलगा मरण पावला.पुन्हा एक दुःख कोसळले.

          तिने भीमराव आंबेडकरांना पत्र लिहिले. त्यात ती लिहिते,रमेश आपल्याला सोडून गेला. तुम्हाला अभ्यासात अडथळा होवू नये म्हणून ही दुःखाची बातमी तुम्हाला कळविले नाही.त्याची क्षमा मागते.मी शक्तीहीन झाले.हे सर्व आघात मी मोठ्या मुश्कील ने सोसत आहे.पण साहेब रमा (रमाई बाबासाहेबांना साहेब म्हणत असत)तुम्हाला विनंती आहे की हे दुःख माझ्यावर सोपवून द्या. तुमच्या अभ्यासात अडथळा येवू देवू नका. स्वतः ची काळजी घ्या. मी सर्व सांभाळते.

           हे पत्र वाचून बाबासाहेबांना खूप दुःख झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. रमाईच्या डोळ्यात दुःखाश्रू तर दुसऱ्या डोळ्यात बाबासाहेबांना दुखातून सावरण्याचे बळ देणारे शब्द होते. याच उर्जेने त्यांनी पुन्हा नेपोलियन हाती घेतला.१९१७ मध्ये बाबासाहेब भारतात आले. दुःख निवळत आले होते. पण पुन्हा एक दुःखाची लाट आली.जिजाबाई ही बाबासाहेबांची सावत्र आई गेली. यापाठोपाठ बाबासाहेबांची मुलगी इंदू गेली. त्यानंतर भाऊ आनंदराव गेले. भावाच्या मृत्यूने कुटुंबात फार मोठी हानी झाली होती. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे प्राध्यापकाची नोकरी पत्करली. साडेचारशे रुपये पगार होता. 

          हे पाहून रमाई च्या जीवात जीव आला होता. कारण तिला वाटले आता माझा नवरा नोकरीत रमला. याच आनंदात तिने पहिल्या पगारात ननंद,जाऊबाई यशवंत, मुकूंद या सर्वाना कपडे घेतले.त्यात यशवंत ची तब्येत संधीवाताने नेहमीच अशीतशी असायची.१९२०साली बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनला जाण्याची तयारी सुरु केली. तेव्हा रमाई आणि बाबासाहेब यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. ते साहजिकही होते. कारण अमेरिकेत असताना रमाई ला खुप त्रास सोसावा लागला. पण ज्ञान साधना सोडणे हेही बाबासाहेबांसाठी अशक्य होते. या ज्ञानाच्या तरफेनेच त्यांना भारतीय समाजात उलथापालथ करायची होती. हे त्यांनी रमाईला समजून सांगितले. तेव्हा रमाईला आपली चुक कळाली होती.बाबासाहेब जुलै मध्ये लंडनला गेले. इकडे गंगाधर हे बाबासाहेबांचे चौथे अपत्य औषधोपचारावाचून गेले. हे पत्राने रमाने कळविले. पत्र वाचून बाबासाहेब खूप दुःखी झाले. आपल्या गैरहजेरीत गंगाधर गेला. याचे खूप त्यांना वाईट वाटले. पण एकीकडे समाजाचे दुःख, दारिद्रय आणि दुसरीकडे कुटुंबातील मृत्यू हे डोळ्यासमोर यक्ष म्हणून उभे होते. गरिबी खूप वाईट असते. दुःखातून माणसाला वर येवू देत नाही.

            १९२३ला बाबासाहेब लंडन वरुन परत आले पण बँरिस्टर होवून. त्यांना डि.एस्सी ही पदवी मिळाली होती. आता त्यांना डॉक्टरेट मिळाली होती.या वेळी रमाचा आनंद गगनचुंबी झाला होता.ज्ञान प्राप्ती झालेला रमाचा पती आता महाबुध्द झाला होता. तो प्रकांड पंडीत झाला होता. ती एक पराक्रमी नवऱ्याची पत्नी झाली होती.पण याच आनंदात पुन्हा दुःखाने आनंदाला गालबोट लावले. राजरत्न बाबासाहेब यांचा अतिशय आवडता मुलगा वारला. आणि दुःखाचा वडच कोसळला. बाबासाहेबांची चार मुल गेली. या दुःखाने ते हादरून गेले होते. दोघांनाही जगण्याचे अवसान राहिले नव्हते. जणूकाही जीवनच ओस पडल होत.रमाई तर वेड्या सारखी झाली होती. पण तरीही रमाईने स्वतः ला सावरले.

            बाबासाहेबाचे संसारातून चित्तच उडाले होते.हे आभाळाएवढे दुःख त्यांना सहन होत नव्हतं.

         रमाईने बाबासाहेबांना समजावले.त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ती म्हणाली,दुःख जे जवळ करतात,ते जीवनात काहीच करु शकत नाहीत.

         पुढे ती म्हणाली,’ साहेब,माझ्यासाठी एवढे करा की,तुम्ही यातून बाहेर पडाव.हिच माझी इच्छा आहे’.मातृत्वाचा बुरुज कोसळत असतानाही रमाई नवऱ्याला धीर देत होती. पायातील बळ गेलेल्या पतीस पुन्हा रमाने सिंहाचे बळ देवून समाजासाठी लढायला उभ केले. रमाई जळत होती पण हरत नव्हती. ती स्वतः जळताना एक नवा सूर्य उजळत होती.ती सूड घेणाऱ्या परिक्षेलाच पराभूत करीत होती. कष्टाने रमाईला पोखरून टाकले होते. दारिद्रयाने शोषण केले होते. पण कुणाकडे हात पसरला नाही. किंवा आपल्या त्यागाची झाळ साहेबांच्या पर्यंत पोहोचू दिली नाही. त्यांना अभ्यासात त्रास होईल म्हणून हे दुःख अमृत म्हणून गटागटा पिवून टाकले.

           १९३० साली इग्लंडला पहिल्या गोलमेज परिषदेत जाण्यासाठी निघाले. तेव्हा रमाईची तब्येत एकदम ढासळली.तरीही रमाईला बाबासाहेबांची काळजी लागली होती.रमाई ला स्वतः च्या मरणापेक्षा बाबासाहेब यांच्या जीवाची काळजी असे. या अवस्थेत रमाला सोडून जाणे शक्य नव्हते.पण लंडनला जाणेही महत्त्वाचे होते. मानसांच्या धार्मिक गुलाम गिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचाआणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता लावायचा होता. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यात समाज बंधनात बांधावयाचा होता.म्हणून बाबासाहेबांनी रमाई त्यांचे कार्यकर्ते मित्र वराळे (सध्या त्यांचे नातू सुप्रीम कोर्टात न्यायधिश म्हणून रुजू झाले) यांच्या कडे बोर्डींगमध्ये धारवाडला ठेवले.तेथे रमाई बरे वाटत होते. एक दिवस मुलांना खायला काहीही नव्हते. तेव्हा रमाई ने विचार ले स्वयंपाक का नाही आज? तेथील अधिकाऱ्याने सांगितले की शासकीय ग्रँट आले नाही. त्यावेळी त्यांनी स्वतः च्या हातातील बांगड्या गिरवी ठेवून पैसे आणावयास सांगितले. आणि मुलांना स्वयंपाक केला.अस रमाईच सुपाचे काळीज होते.

          याच रमाई त्यागातून एक युगप्रवर्तक ,युगपुरूष निर्माण होत होता. कारण रमाई मुळे कुटुंबाचा रथ व्यवस्थितपणे सांभाळत होती. म्हणून बाबासाहेबांना घरची काळजी न करता समाजासाठी भरपूर वेळ मिळत होता. हाती घेतलेले समाजकार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केले. त्यांनी या दीन दलित कोट्यवधी जनतेसाठी सर्वाना न्याय देणारे भारतीय संविधान लिहून जगाला एकात्मतेचा आदर्श दिला होता. त्यांच्या या वैभवशाली राष्ट्रीय कार्यात उर्जायनी म्हणून रमाई चा सिंहाचा वाटा होता.

         १९३५ साल उजाडलं.डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य उगवत होता. तसेच रमाई नावाची चंद्रिका अदृश्य होत चालली होती. नव्या सूर्याची पहाट झाली आणि २७ मे१९३५ ला ह्या त्यागमुर्ती रमाई नावाची चंद्रिका अस्तास गेली. कोटी जनांची महामाता त्यांना अंतरली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आधार स्तंभ उन्मळून पडला. आंबेडकरी परिवार पोरका झाला. एका युगंधराची पत्नी, महापुरुषांची उर्जायनी थांबली होती.एक महाकाव्य समाप्त झाले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर धाय मोकलून रडत होते. राजगृह शोकसागरात बुडून गेले होते.

        या निमित्ताने प्रत्येक महिलेने रमाई समजून घेवून रमाई चा आदर्श जपला पाहिजे. एक स्त्री काय करु शकते.हे रमाई कडून शिकले पाहिजे. आपल्या कष्टातून,त्यागातून संसाराचा गाडा ओढत एक जगप्रसिद्ध महामानव निर्माण केला.म्हणून महिलांनी स्वतः ला कमी न समजता एक उध्दारक समजले पाहिजे. जिजाऊ, सावित्री,रमाई सारखे मुलगा, मुलगी किंवा पती यांच्यातील वैभव शोधून त्यास प्रेरित केले पाहिजे. त्यांच्यात उर्जा भरून त्यांचे यश गगनचुंबी केले पाहिजे. तरच आम्ही या तीन महामाताचे वारस म्हणून शोभूत.

शेवटी म्हणेन,

नवकोटीची तू माता

नाव तूझे गं रमाई

बापाचाही बाप भीमा

तू दीन दलितांची आई

चढता पहाड यशाचा

तू सिंहाचं धाडस दिलं

रमा तू लेखनी भीमाची

एकेक अक्षर सोनं केलं

भीमसागर अथांग आहे

भीमकिर्ती चोहीकडे वाहील

जगी असे सूर्य चंद्र तोवर

विश्वात रमाई नाव राहील.

बाबुराव पाईकराव

   डोंगरकडा

9665711514