प्रदीप रामटेके/शुभम गजभिये..
चिमूर तालुक्यातील शंकरपूर,नेरी,खंडसंगी आणि चिमूर परिसरात सध्या अवैध व्यवसायांनी उच्छाद मांडला असून,स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने हे धंदे राजरोसपणे सुरू असल्याचा खळबळजनक आरोप रिपब्लिकन सेना पक्षाचे चिमूर तालुका अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी केला आहे. या संदर्भातत्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना निवेदन देऊन तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. कायदा-सुव्यवस्था धाब्यावर?
निवेदनानुसार,शंकरपूर आणि नेरी परिसरात अवैध जुगार (रम्मी),रेती तस्करी,सट्टा आणि गावठी व विदेशी दारूची अवैध विक्री उघडपणे सुरू आहे.विशेष म्हणजे,यापूर्वी नागपूर आयजी कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर काही काळ हे धंदे बंद झाले होते.मात्र आता पुन्हा एकदा या माफियांचे फावले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पोलीस चौकीचे PSI वाघ रडारवर!…
निवेदनात शंकरपूर पोलीस चौकीचे PSI वाघ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.वाघ हे अवैध धंद्यांच्या माफियांना पाठबळ देत असून,त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला मोठी चालना मिळाल्याचे मेश्राम यांनी म्हटले आहे.
तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हप्तखोरीला आळा घालण्यासाठी चक्क ‘चेक’ सुपूर्द!…
प्रशासनातील भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे,हे दर्शवण्यासाठी जगदीश मेश्राम यांनी एक अनोखे पाऊल उचलले आहे.
पोलीस प्रशासनाने अवैध धंदेवाल्यांकडून ‘हप्ते’ घेऊ नयेत,यासाठी त्यांनी चक्क HDFC बँकेचे ७ कोरे चेक निवेदनासोबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
हा प्रकार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून,पोलीस दलातील भ्रष्टाचाराची ही एक मोठी चपराक मानली जात आहे.
४८ तासांचा अल्टिमेटम…
“जर येत्या ४८ तासांत शंकरपूर परिसरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद झाले नाहीत आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात आले नाही, तर आम्ही लोकशाही मार्गाने पोलीस महासंचालक कार्यालयाकडे दाद मागू,” असा इशारा जगदीश मेश्राम यांनी दिला आहे.
निवेदनासोबत त्यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांची सविस्तर यादीही पोलिसांना दिली आहे.आता जिल्हा पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सदर निवेदन सोबत जोडलेले चेक परत केले.यावेळी उपजिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनी संताप व्यक्त केला.
निवेदन देताना सावरी ग्रामपंचायतचे सरपंच लोकनाथ रामटेके,माजी उपसरपंच शेषराव ठेपाले उपस्थित होते.



