दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – श्री क्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी आणि वारीसाठी मुळशी तालुक्यातून येणाऱ्या वारकरी बांधवांसह संप्रदायाच्या विविध उपक्रमांसाठी उभारण्यात आलेल्या ‘मुठा खोरे वारकरी भवन’ या अत्याधुनिक सोईसुविधांनी सुसज्ज भवनाचे लोकार्पण रविवारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सोहळ्यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तिप्राणप्रतिष्ठा आणि कलाशारोहण विधी भक्तिभावाने पार पडला. वारकरी बांधव, माता भगिनी आणि मान्यवर मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त करत मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “वारकरी बांधवांच्या सेवेत नेहमीच समाधान मिळते. संतपूजनाच्या माध्यमातून दरवर्षी कोथरुडमधून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना पारमार्थिक साहित्य देण्याचा उपक्रम राबविला जातो. तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथेही कोथरुड वारकऱ्यांसाठी भवन उभारण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर, आमदार शंकरभाऊ मांडेकर, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, राजाभाऊ चोपदार, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुठा खोरे वारकरी संप्रदाय समितीचे अध्यक्ष रामचंद्र महाराज भरेकर, रामशेठ गावडे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर, किरण येळवंडे आदी मान्यवर उपस्थित होते.



