आळंदीत शिवसेनेच्या वतीने ‘होऊ द्या चर्चा’ला मोठा प्रतिसाद…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : भाजपशासित केंद्र व घटनाबाह्य राज्य सरकारने मोठमोठय़ा घोषणा व पोकळ आश्वासने देऊन जनतेला फसवण्याचे काम केले आहे. जनतेची दिशाभूल करून आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपली पोळी भाजणे, हा एकमेव कार्यक्रम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे.

        शिवाय भ्रष्ट व गैरमार्गाने संपत्ती गोळा केलेल्या व्यक्तींना धुतल्या तांदळासारखे स्वच्छ करणारे भाजपा एक नामांकित वॉशिंग मशीन आहे. असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना नेते अशोकराव खांडेभराड व माजी उपसभापती अमोल पवार यांनी केला.

        तिर्थक्षेत्र आळंदी येथे सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानात ते बोलत होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख अविनाश तापकीर, महीला आघाडी प्रमुख अनिता झुजम, राहुल सोमवंशी, महेश तापकीर, भारती वाघमारे, शोभा तापकीर, संतोषी पांडे, शुभांगी यादव, जयश्री केंद्रे, योगिता धूमाळ, उषा नेटके तसेच महीला व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

          पेट्रोल-डिझेल व इंधन दरवाढीने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांना दोन वेळचे अन्नदेखील मिळणे बिकट झाले आहे. याउलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातल्या कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शिवभोजनसारखी अभिनव संकल्पना राबवली.  शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भावाची हमी देऊ सांगणारे शेतकऱ्यांच्या पिकाला दीडदमडीचाही भाव मिळत नसताना डोळे बंद करून गप्प आहेत. सर्वसामान्य सरकारच्या या नाकर्तेपणाला कंटाळला असून मनातल्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी ‘होऊ द्या चर्चा’तून संताप व्यक्त होत आहे, अशी भावना शिवसेना महीला आघाडी प्रमुख अनिता झुजम यांनी बोलून दाखवली.