81 वर्षीय मारोतराव कावळे यांचा 61 वा लग्न वाढदिवस कार्यक्रम ‘मानव सेवा मंडळ’ तसेच कुटुंबियांतर्फे अनोख्या व अभिनव प्रकारे उत्साहात साजरा..  — ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे यानिमित्ताने ‘नेचर पार्क’वर केले वृक्षारोपण व रेंगेपार वृद्धाश्रमात केले फळवाटप…

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-  

      ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने लाखनी बसस्थानकावर तयार केलेल्या ‘नेचर पार्क’वर मानव सेवा मंडळाचे सदस्य दररोज सुदृढ आरोग्यासाठी सकाळी विविध योग, शारीरिक व्यायामविषयक ,नृत्य व्यायाम उपक्रम करीत असतात.याच मानव सेवा मंडळात सक्रिय सभासद असलेले 81 वर्षीय मारोतराव कावळे यांच्या लग्नास 61 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने त्यांचा लग्नवाढदिवस कार्यक्रम ग्रीनफ्रेंड्सच्या नेचर पार्क वर तसेच गुरुकुल आय टी आय येथे उत्साहात व आनंदी वातावरणात मानव सेवा मंडळ तसेच कावळे कुटुंबियातील नातलग ,आप्तपरिवार तर्फे साजरा करण्यात आला. ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे हितचिंतक असलेले मारोतराव कावळे यांचे हस्ते वृक्षारोपण लाखनी बसस्थानक नेचर पार्कवर करण्यात येऊन 61 व्या लग्नवाढदिवस निमित्ताने केक ‘नेचर पार्क’ मध्ये वृक्षांच्या गार सावलीत कापण्यात आला. तसेच रेंगेपार येथील ‘मानवता वृद्धाश्रमाला’ मानव सेवा मंडळ व कुटुंबियांनी भेट देऊन सर्वांना फळेवाटप कार्यक्रम घेण्यात आला व वृद्धांशी हितगुज करून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.यावेळी मानवता वृद्धाश्रमाला छोटीशी भेट सुद्धा देण्यात आली. सायंकाळी गुरुकुल आय टी आय येथे लग्नस्टेज व मंडप तयार करून मारोतराव कावळे व त्यांच्या सौभाग्यवती अनुराधा कावळे याचे विधिवत लग्न मंगलाष्टके वाजवून लावण्यात आली.दोघांनीही एकमेकांचे आदर दर्शविणारे उखाणे घेतले. यानंतर मानव सेवा मंडळाच्या सदस्यांनी एकत्रितपणे सप्रेम भेट देऊन सर्वात ज्येष्ठ व श्रेष्ठ वयोवृध्द कावळे दाम्पत्याचे आशीर्वाद घेतले.यावेळी वधू- वरांचे मामा म्हणून मानव सेवा मंडळाचे ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर व टोलीराम सार्वे यांनी कर्तव्य बजाविले. यानंतर 61 व्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने स्टेजवर केक सुद्धा कापून चमकी फटाक्यांचा बहार उडविण्यात आला.यावेळी कावळे परिवारातील एकेएक करीत सर्व सदस्यांचा मुले-सुना,जावई-मुली ,नातू-नातनी -नातसुना, पणनातू सहित सर्वांचा परिचय मानव सेवा मंडळातर्फे स्टेजवर घेण्यात आला.यानंतर मानव सेवा मंडळाच्या सपत्नीक तसेच एकटेच आलेल्या सदस्यांचा सुद्धा परिचय कावळे कुटुंबीयांना आप्तगनांना देण्यात आला.यावेळी सर्वांकरिता सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या व शानदार कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड शफी लद्धानी यांनी तर संचालन ज्ञानेश्वर गिरेपुंजे तर आभार प्रदर्शन मोठ्या सुनबाई श्रीमती कावळे यांनी केले.याप्रसंगी त्यांनी सासरेबुवा व सासूबाईची ह्र्दयगत आठवण व अपार प्रेम दर्शविणारी कवितेचे वाचन करून सर्वांचे मन जिंकले. यावेळी मेजर ऋषी वंजारी व शिवलाल निखाडे यांनी सुध्दा मानव सेवा मंडळाच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर मानव सेवा मंडळाच्या सदस्यांनी दोन गाण्यावर नृत्यठेका धरून सर्वांचे मन जिकले .कावळे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सदस्यांनी सुद्धा सपत्नीक बराच वेळ नृत्यताल घेतला. अशारितीने मानवसेवा मंडळ आणि ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे मारोतराव कावळे यांचा 61 वा लग्न वाढदिवस गुरुकुल आय टी आय तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या ‘नेचरपार्क’ वर अनोख्या व आगळ्यावेगळ्या पद्धतीने घेण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी गुरुकुल आय टी आय प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम,कोषाध्यक्ष जयश्री मेश्राम तसेच,कावळे कुटुंबीय व त्यांचे मित्रगण, मानव सेवा मंडळाच्या सदस्यांनी तसेच ग्रीनफ्रेंड्सच्या पदाधिकारीनी सक्रियपणे परिश्रम घेतले.ह्या आगळ्यावेगळ्या 61 व्या लग्न वाढदिवसाची लाखनी शहरात सर्वत्र चर्चा होती.