आदर्श गावातच रोजगार सेवकाने केला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, कामात अफरातफर, अनियमितता केल्याप्रकरणी विस्तार अधिकाऱ्यांची खल्लार पोलिसात रोजगार सेवकाविरुध्द तक्रार.. — खल्लार पोलिसांत गुन्हा दाखल… — फरार रोजगार सेवकास अटक…

 

युवराज डोंगरे/खल्लार प्रतिनिधी

आदर्श गाव असलेल्या गावातच गावातील रोजगार सेवकाने महात्मा गांधी ग्राम रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून विस्तार अधिकारी यांच्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांत रोजगार सेवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर भ्रष्टाचार करणारा आरोपी रोजगार सेवक हा फरार झाला होता.अखेरीस फरार रोजगार सेवकास खल्लार पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने आरोपी रोजगार सेवकास दि 6 मे पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली असून आरोपी खल्लार पोलिसांच्या ताब्यात आहे.

खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील घोडसगाव हे आदर्श गाव म्हणून परिचीत आहे. या गावात सतिश मधुकर भोयर(49)हा महात्मा गांधी ग्राम रोजगार हमी योजनेच्या कामावर रोजगार सेवक म्हणून कार्यरत असतांना गावातील कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर करुन गैरप्रकार करुन अनियमितता केल्या प्रकरणी त्याचे विरुध्द माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रदीप गोमासे, सरपंच सौ केसरबाई अजाबराव नितनवरे यांनी दि 7 जुलै 2021 ला दि 27/4/17ते दि29/9/2020 या कालावधीत कामावरील मजुरांचे खोटे मस्टर काढणे, कामावर नसलेल्या मजुरांच्या खोट्या सह्या करणे, सरपंच सचिव यांच्या खोट्या सह्या करणे,अशी मिळून 88,763रुपयांची अफरातफर केली होती याबाबतची रितसर लेखी तक्रार वरिष्ठांकडे दाखल केली होती.

वरिष्ठांनी याबाबत सर्व चौकशी करुन हे प्रकरण अंजनगाव पं स च्या विस्तार अधिकारी सौ रंजना मधुकर पातोडे यांच्याकडे वर्ग केले होते त्यानुसार विस्तार अधिकारी रंजना पातोडे यांनी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला खल्लार पोलिसात रोजगार सेवक सतिश भोयर याचेविरुध्द तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारींवरून खल्लार पोलिसांनी सतिश भोयर विरुध्द अप नं 2/23 कलम420,464,468,आय पी सी 477,471नुसार गुन्हा दाखल केला होता. आपल्याविरुध्द तक्रार दाखल झाल्याचे माहीत होताच आरोपी रोजगार सेवक हा फरार झाला होता. फरार झालेल्या रोजगार सेवकास खल्लार पोलिसांनी दि 2 मे ला शोधून अटक केली व त्यास पोलिस कस्टडीसाठी अंजनगाव येथील फौजदारी न्यायालयात दि 3 मे ला हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 6 मे पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली सध्यस्थितीत आरोपी हा खल्लार पोलिस कस्टडीमध्ये असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

याप्रकारणामुळे रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या इतर रोजगार सेवकांचे धाबे दणाणले आहेत हे मात्र विशेष.