शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
उपविभागीय अभियंता,सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर,जि.चंद्रपूर यांना शंकरपूर येथील उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी निवेदन दिले असून मौजा शंकरपूर येथील रोडलगत असलेल्या धोकादायक विहिरीबाबत तात्काळ उपाययोजना करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली.
उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनात म्हटले आहे की,मौजा शंकरपूर येथील कानपा रोड मुख्य रस्त्याचे अलीकडेच रुंदीकरण करण्यात आले आहे.सदर रुंदीकरणामुळे रस्त्याच्या कडेला असलेली एक जुनी विहीर सध्या अत्यंत धोकादायक स्थितीतअगदी रस्त्याच्या काठावर आली आहे.
ही विहीर कोणत्याही प्रकारच्या सुरक्षाव्यवस्थेशिवाय उघडी असल्यामुळे वाहनचालक,पादचारी तसेच शालेय विद्यार्थी यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.तरी आपणास नम्र विनंती आहे की,सदर बाबीची तात्काळ दखल घेऊन संबंधित विहिरीची योग्य ती विल्हेवाट लावावी,अथवा मजबूत संरक्षण भिंत/जाळी/रेलिंग उभारून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
जर या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाले व कोणतीही कारवाई करण्यात आली नाही,तर शंकरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. अशोक ज्ञानेश्वर चौधरी हे गावकऱ्यांसह आपल्या विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यास बाध्य होतील,याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
याचबरोबर मनुष्य व इतर हानी झाल्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असेही निवेदनात नमूद आहे.
अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तात्काळ कार्यवाही करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे,अशी विनंती उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर यांना करण्यात आली आहे.
निवेदनाची सत्य प्रत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागभिड,जि.चंद्रपूर यांना पाठविण्यात आली आहे.



