आरोग्य हिच संपत्ती:- आमदार कृष्णा गजबे 

ऋषी सहारे

संपादक

देसाईगंज –

      आरोग्याची संकल्पना कशी करता येईल? शरीर आणि मन जर पूर्णपणे स्वस्थ असेल, आणि स्वस्थ असल्याची जाणीवही तुम्हाला नसेल तेव्हाच आरोग्य असते, असे समजा. कारण स्वास्थ्य बिघाड असल्यास आपल्याला सतत शरीराची आठवण होत राहते म्हणून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य येण्यासाठी जे जे करता येईल ते ते करणे आवश्यक आहे.आजचा काळ हा स्पर्धेचा काळ म्हणावा लागेल, जिथे सर्वजण एका वेगळ्याच धावपळीत गुंग आहेत. अनेकांचे तर फक्त काम आणि पैसा एवढ्याच दोन गोष्टींकडे लक्ष असते. परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात परवडणारे नसते. आपली जबाबदारी म्हणून शरीराकडे कितीसे लक्ष आपण देत असतो याचा विचार केला पाहिजे. आपले आरोग्य आपणच जपले पाहिजे. असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

लाडज येथे आयोजित आरोग्य शिबीर मध्ये आमदार कृष्णा गजबे, सरपंच रुपलताताई बोदोले, उपसरपंच प्रभाकर चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष तथा माजी सरपंच योगेश नाकतोडे, डॉक्टर धनंजय बर्डे, डॉ. गहाने, डॉ. कोर्शे, डॉ. सहारे, जगण सुंदरकर, विनोद ढोरे मा. ग्रा. पं. सदस्य, गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते

        आमदार गजबे पुढे म्हणाले की, आजचे दवाखाने, औषधोपचार, शस्त्रक्रिया ह्या एवढ्या महागड्या आहेत की व्यक्ती नाईलाज म्हणून तो खर्चही सहन करतो. अशातच त्यात जाणारा वेळही खूप असतो. रासायनिक औषधे आपल्याला वरचेवर बरे करतात आणि त्यांचे सेवन जीवनभर करावे लागेल अशी ग्वाही स्वतः डॉक्टरच देतात. म्हणजे एखादी समस्या उद्भवली की कायमचा उपाय करण्यापेक्षा आपण मेडिकल, दवाखाना यांच्याशी बांधले जातो. त्या सर्वांचा असणारा मनःस्तापही मोठा असतो.