Home शैक्षणिक सोडे आश्रम शाळेचा दणदणीत निकाल,शंभर टक्के निकालाची परंपरा कायम…

सोडे आश्रम शाळेचा दणदणीत निकाल,शंभर टक्के निकालाची परंपरा कायम…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

       एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा, सोडे ता धानोरा जिल्हा गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी यंदाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा निकाल शंभर टक्के लावला आहे. कला शाखांमध्ये मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

         विशेष म्हणजे, शिक्षण विभागाच्या ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत कडक अंमलबजावणी असतानाही सोडे आश्रम शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे या यशाला अधिकच मानाचे पंख लाभले आहेत.

          या यशामागे आदिवासी विकास विभाग नागपूर येथील अप्पर आयुक्त आयुषी सिंह (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शन, प्रकल्प अधिकारी अरुण एम. (भा.प्र.से.), सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) वैद्य शेख, तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डॉ. प्रभुजी सादमवार व नरेंद्र कावळे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. यासोबतच शाळेचे मुख्याध्यापक एस.आर.मंडलवार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकवृंदाने घेतलेली मेहनतही या यशाची प्रमुख कडी ठरली.

         यंदा कला शाखेत 28 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी कु.फुलकुवर रामसाय कोमरे हिने 78% गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. पायल कालिदास कड्यामी (70.00%) द्वितीय, तर प्रियंका जयपाल खलको (69.33%) तृतीय क्रमांकावर राहिली. विशेष म्हणजे प्रथम श्रेणीत 10 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत 16 विद्यार्थिनी यश मिळवून उत्तीर्णतेचा उच्च दर कायम ठेवला.

        या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एस आर मंडलवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.रंजना उसेंडी , तसेच उच्च माध्यमिक शिक्षक अविराज भुजाडे, अनिल पोटे, कु.योगिता बिसेन, डॉ.विभा भैसारे, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

        सोडे आश्रम शाळेचा हा यशस्वी प्रवास ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाला नवी दिशा देणारा ठरत असून, ‘मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न’ यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.