गडचिरोली येथे “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकाचे मोफत आयोजन.- मान्यवरांची उपस्थिती.

 

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली –

गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचं रान करुन वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागड च्या सुपुत्राची, आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग गडचिरोली येथे ३ सप्टेंबर २०२२ ला मोफत सादर होणार असून रसिक प्रेक्षक मोठ्या उत्साहाने या नाटकाच्या प्रयोगाची वाट पाहत आहेत.

          झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी या नाटकाचे लेखन केलेले असून, प्रसिद्ध गायक, दिग्दर्शक व निर्माता अनिरुद्ध वनकर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने त्यांच्या लोकजागृती संस्था, चंद्रपूर च्या वतीने या नाटकाची निर्मिती केली आहे. 

या नाटकात ‘पल्याड’ व ‘टेरिटरी’ या चित्रपटातील कलावंत भारत रंगारी यांची भूमिका असून सोबतच निखिल मानकर, राजरत्न पेटकर, मुन्ना बिके , व नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली यांचे “नाट्य प्रशिक्षण शाळेत” सहभागी ३० कलावंत भुमिका करीत आहेत. रेला नृत्य, आकर्षक प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत या नाटकाचे खास आकर्षण आहे.

      या नाटकाचे उद्घाटन मा. नाम. विजय वडेट्टीवार ( विरोध पक्षनेते, विधानसभा, महाराष्ट्र राज्य ) यांचे अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख उपस्थिती मा. अशोक नेते (खासदार), मा. डॉ. देवराव होळी (आमदार), मा. कृष्णा गजबे (आमदार), मा. संजय मीणा (भाप्रसे) जिल्हाधिकारी गडचिरोली, मा. आयुषी सिंग, (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.गडचिरोली, मा. डॉ. प्रशांत बोकारे (कुलगुरू) गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, मा. डॉ. श्रीराम कावळे, (प्र. कुलगुरू), मा. डॉ. अनिल हिरेखन (कुलसचिव), मा. शिवप्रसाद गौड (अतिथी प्राध्यापक, राष्ट्रीय नाट्य विद्यालय) नवी दिल्ली, मा. डॉ. नामदेव उसेंडी (माजी आमदार), प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, डॉ. सचिन मडावी,(सहा. आयुक्त ) सामाजिक न्याय विभाग, डॉ. दावल साळवे (जिल्हा आरोग्य अधिकारी), मा. महेंद्र ब्राह्मणवाडे (अध्यक्ष, कॉंग्रेस कमिटी), डॉ. राम मेश्राम (माजी नगराध्यक्ष), मा. रवी वासेकर (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),मा. माधव गावड (अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन), डॉ. नामदेव किरसान ( सहसचिव, महा. प्रदेश, काँग्रेस)इ. उपस्थित राहणार आहेत.

        झाडीपट्टीतील ज्येष्ठ कलावंत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, डॉ. शेखर डोंगरे, के. आत्माराम, मुन्ना बिके, भारत रंगारी व मा. मुनिश्वर बोरकर यांचे या प्रयोगास सहकार्य लाभले असून संगीता टिपले (कार्यशाळा संचालक) व अनिरुद्ध वनकर (कार्यशाळा समन्वयक) हे निमंत्रक आहेत.