दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : समरसता, समानता, एकात्मता ही वेदांची मूलभूत शिकवण आहे. समाजात बंधुभाव आणि संघटनाची ताकद निर्माण करायची असेल तर वेद-गीतेकडे परतणे अत्यावश्यक आहे, असे विचार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केले. मोशीतील वेदश्री तपोवन येथे आयोजित गीता जयंती महोत्सवात ते बोलत होते.
या सोहळ्यात शांतीब्रम्ह ह.भ.प.मारुती महाराज कुरेकर यांना संत ज्ञानेश्वर पुरस्कार, हैदराबादच्या चिलकूर बालाजी मंदिराचे अर्चक सी.एस. रंगनाथन यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार, तर समाजसेवक डॉ. मुकुंद दातार यांना विशेष मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास गोविंददेव गिरी महाराज, गीता महोत्सव स्वागताध्यक्ष अभय भुतडा, गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांची उपस्थिती होते.
राज्यपाल म्हणाले वेदांचा सार उपनिषदांत आणि उपनिषदांचा सार गीतेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय जीवनमूल्यांचा गौरव वाढविणाऱ्या विचारांची कास धरली. संत ज्ञानेश्वरांनी गीतेला जनभाषेत पोहोचवले आणि हजारो बालकांच्या मनात आध्यात्मिक चेतना जागवली. गीतेत मानवजीवनातील सर्व समस्यांचे निराकरण आहे. युवकांना गीतेचे शिक्षण दिल्यास ते व्यसनमुक्त, संयमी आणि मूल्यनिष्ठ जीवन जगू शकतात.
यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, “गीतेचे जनभाषेतले रूपांतर संत ज्ञानेश्वरांनी केले म्हणून हा महोत्सव महाराष्ट्रासाठी विशेष. गीतेचा दीप संपूर्ण मानवतेला मार्गदर्शक आहे.”
कुरेकर महाराज आणि रंगनाथन यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात श्लोकांची अंताक्षरी, गीतेवरील श्लोकगायन, तसेच विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमापूर्वी राज्यपालांनी वेदश्री तपोवन परिसरातील वेद विद्यालय पाहिले. वेद-उपनिषदांच्या अभ्यासासाठी अत्याधुनिक ई-लायब्ररी, दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन, तसेच गुरुकुल परंपरेचे शिक्षण पाहून राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.



