अबोदनागो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत..
अमरावती :- कोणताही ठोस पुरावा नसतानाही फ्रेजरपुरा पोलिसांनी चोख तपास करून घरफोडीतील कुप्रसिद्ध आरोपीला अटक केली.पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपीवर यापूर्वीही मालमत्तेविरुद्धचे तसेच शस्त्र अधिनियमाखाली गुन्हे दाखल आहेत.
फिर्यादी लक्ष्मण चिंतामण शेलारे (वय ४०, रा. किशोरनगर, दळणवळण केंद्राजवळ, अमरावती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी ते व त्यांची पत्नी दोघेही नोकरीसाठी बाहेर गेले होते.
रात्री पत्नी घरी परतली असता घराचे कुलूप तोडलेले दिसले.तपासणी केली असता घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून १ लाख १४ हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याचे समोर आले.
फिर्यादीचा पती नागपूर येथे नोकरीवर असल्याने त्यांनी दि. ३१ ऑक्टोबर रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात जबाब दिला.त्यावरून कलम ३०५ (अ), ३३१ (३) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला.
तपासात सीसीटीव्ही व गुप्त माहितीचा आधार….
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.तसेच हद्दीतील संशयित गुन्हेगारांची चौकशी सुरू केली.
दरम्यान,गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिसांनी संशयित तेजस पंडित गणवीर (वय २३, रा. नवाबपुरा नेरपरसोपंत, जि. यवतमाळ, ह.मु. प्रबुद्ध मंडळाजवळ,वासे वाडा,फ्रेजरपुरा) याला ताब्यात घेतले असता चौकशीत त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
दागिने आणि रोकड हस्तगत….
आरोपीकडून पोलिसांनी लेडीज अंगठी (५ ग्रॅम), सोन्याचे झुमके (१०.५ ग्रॅम), कानातील टोप्स (१.५ ग्रॅम) व रोख ५,३६० रुपये असा एकूण १,०७,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हा उघडकीस आणताना घटनास्थळावर कोणताही ठोस पुरावा नसतानाही पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे उत्कृष्ट तपासाचे कौशल्य पोलिसांनी दाखविले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया,उपायुक्त (परिमंडळ १) गणेश शिंदे, व सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पथकाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, निरीक्षक निलेश गावंडे (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन, सपोउपनि. योगेश श्रीवास, तसेच नापोशी हरीश चौधरी, शशिकांत गवई, सुरज यादव, पोशि जयेश परिवाले, रोषण वन्हाडे आणि चालक अमोल राठोड यांनी केले.



