अबोदनागो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत…
अमरावती :- भ्रष्टाचारविरोधी कारवाईच्या अनुषंगाने भातकुली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस हवालदाराविरुद्ध लाच मागणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे.
लाचलुचपत विभागाची सापळा मोहीम…
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्राचे अपर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी मौखिक आदेश देत एका तक्रारीची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रविण वेरुळकर यांनी 11 ऑगस्ट रोजी सापळा रचून कार्यवाहीसाठी आवश्यक साहित्य आणि पंचांसह अकोलाहून अमरावतीकडे प्रयाण केले.
अमरावतीत आल्यानंतर प्रकाश मोहन रघुवंशी (वय 60, रा.लक्ष्मीनगर,नरहरी बाबा मंदिराजवळ,अमरावती) यांनी एका लोकसेवकाविरुद्ध तक्रार नोंदविली.त्यानंतर दोन सरकारी पंचांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला.
तक्रारीचा तपास आणि संभाषणाचे रेकॉर्डिंग….
रघुवंशी यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार,संभाषणादरम्यान भातकुली पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार अब्दुल रहीम अब्दुल कविर (वय 54, रा. जाकीर कॉलनी, अमरावती) यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन केवटी यांच्या वतीने तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.ही मागणी तक्रारदाराला तपासात मदत करण्याच्या बदल्यात करण्यात आल्याचे समजते.
मुख्यालयाचे मार्गदर्शन आणि गुन्हा नोंदणी…
या तक्रारीची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर,मुंबई येथील मुख्यालयाकडून पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले.प्राप्त मार्गदर्शनानुसार,भातकुली पोलिस ठाण्यातील हवालदार अब्दुल रहीम यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 च्या कलम 7 व 7(ए ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तथापि,या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.


