Home Maharashtra पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पाच्या प्रगतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा…

पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पाच्या प्रगतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा…

दिनेश कुऱ्हाडे 

उपसंपादक 

पुणे विभागीय 

पुणे : आज प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या विकासप्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला. विकासप्रकल्पांना आवश्यकतेनुसार राज्य आणि केंद्र शासनाची मंजुरी मिळवणं, निविदा प्रक्रिया गतिमान करणं, विकासकामांच्या आड येणारी अतिक्रमणं तातडीनं हटवणं, आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करणं, प्रशासकीय तसंच प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडथळे दूर करणं आदी बाबी प्राधान्यानं करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

        यावेळी पवार म्हणाले की पुण्यासह, राज्याच्या कुठल्याही भागातील महत्वाचे विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी अडून राहणार नाहीत. पुणे मेट्रो, पुणे रिंगरोड, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालये, ‘सारथी’ संस्थेचं कामकाज अधिक व्यापक, गतिमान करण्यासाठी संस्थेचं पुण्यातील मुख्यालय व औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचं बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावं. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून सर्व कामं प्राधान्यानं पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.

         पुणे मेट्रो रेल्वेच्या तिन्ही प्रकल्पांची कामं वेगानं सुरु आहेत. पुणे बाह्य रिंगरोडसाठी भूसंपादनाचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या कामानं वेग घेतला आहे. सातारा वैद्यकीय महाविद्यालयाचं बांधकाम वर्षभरात पूर्ण होईल. अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामांसाठी टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे. वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं कामही मार्गी लागलं आहे. राज्यातील विकासकामांची ही गती अशीच कायम राहिल, असा विश्वास आहे. 

           पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, पुणे तसंच मुंबईतील जीएसटी भवन, कोकणातील ९३ पर्यटन केंद्रांना जोडणारा कोकण सागरी महामार्ग, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, पंढरपूर शहर आणि विठ्ठल मंदिर परिसराचा विकास आदी विकासकामांच्या प्रगतीचा तसंच निधी उपलब्धतेचा आयोजित बैठकीत आढावा घेण्यात आला. रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग किनाऱ्यालगतंच गेला पाहिजे, अशी सूचना केली. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन महामार्गाच्या आराखड्याचा आढावा घेतला जाईल. 

          गणपती सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका सुस्थितीत करण्यात आली आहे. सदर महामार्गाचे बांधकाम लवकर पूर्ण होईल, यादृष्टीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.