भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
खरीप हंगामाची तयारी सुरू असताना आदिवासी विकास सहकारी संस्था रांगी यांनी अद्याप शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले नसल्याने परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
वेळेत कर्ज उपलब्ध न झाल्यामुळे बियाणे,खते,औषधे आणि शेती मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून किंवा इतर मार्गांनी पैसे उभारण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की,शासनाच्या विविध योजनांमधून पीक कर्ज वेळेवर मिळणे अपेक्षित असते.मात्र यावर्षी कर्जवाटप प्रक्रियेला विलंब होत असल्याने शेतीच्या नियोजनावर परिणाम होत आहे.
पावसाळा जवळ आला असून शेतीची पूर्वतयारी करण्यासाठी निधीची नितांत गरज आहे.कर्जवाटप रखडल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत.
याबाबत संबंधित संस्थेकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कर्जवाटप प्रक्रिया पूर्ण करावी,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की,जर लवकरात लवकर कर्जवाटप करण्यात आले नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो.खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याने संबंधित विभागाने तत्काळ कार्यवाही करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


