शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
पळसगांव :- ग्रामपंचायत निवडणुकीतील सदस्य आरक्षणात ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व नगण्य होत असताना समाजातील शांतता ही चिंतेची बाब असल्याचे मत राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सुभाषराव सातपुते यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले की, “आज आपण आपल्या हक्कांबाबत जागे झालो नाही, तर उद्या येणाऱ्या पिढीला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. आपल्या अधिकारांवर परिणाम होत असताना गप्प बसून चालणार नाही. आता झोपेचे सोंग सोडून संघटित होण्याची वेळ आली आहे.” ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या समोर येण्यासाठी जातनिहाय जनगणना ही काळाची गरज असून, त्याशिवाय सामाजिक न्यायाचे योग्य नियोजन शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक ओबीसी बांधवाने आपल्या हक्क, प्रतिनिधित्व आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि जातनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता चंद्रपूर येथे गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात युवक, महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्व ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी, असे आवाहन श्रीहरी सुभाषराव सातपुते यांनी केले आहे.
“हक्क मागून मिळत नाहीत, त्यासाठी जागरूकता आणि संघटित संघर्ष करावा लागतो. आता शांत बसण्याची नाही, तर आपल्या अस्तित्वासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे.” असेही ते म्हणाले.



