दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : “वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यामुळे पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केल्यास भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळू शकेल,” असे प्रतिपादन आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत पोपटराव कुऱ्हाडे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आळंदी नगरपरिषदेच्या वतीने सिद्धबेट परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण संवर्धन व हरित आळंदीच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी उपनगराध्यक्षा सुजाता कालिदास तापकीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन गिलबिले, सागर कुऱ्हाडे, सुनील घुंडरे, संतोष रासकर, दिनेश घुले, संदीप रासकर, नगरसेविका साक्षी कुऱ्हाडे, पुजा घुंडरे, ऋतुजा तापकीर तसेच अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्ष कुऱ्हाडे पुढे म्हणाले की, वृक्ष हे केवळ निसर्गाचे अलंकार नसून मानवाच्या अस्तित्वाचा आधारस्तंभ आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वृक्षसंवर्धनाची चळवळ लोकसहभागातून अधिक व्यापक करणे आवश्यक आहे.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करून नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. संतभूमी आळंदीतील पावन व ऐतिहासिक सिद्धबेट परिसरात झालेल्या या वृक्षारोपण उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे. हरित क्षेत्रवाढ, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन आळंदी नगरपरिषद भविष्यातही विविध लोकहितकारी पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



