दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
पुणे :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या परिसरात शुक्रवारी (ता.५) वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पर्यावरणाचा समतोल राखणे आणि भावी पिढीला हिरवेगार भविष्य देणे या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी आणि उपाध्यक्षा ऍड.रेणुका चलवादी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते विविध औषधी व सावली देणाऱ्या रोपांची लागवड करून झाली. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थितांना संस्थेच्या वतीने रोपांचे वाटप करण्यात आले.प्रत्येक कर्मचाऱ्याने एका झाडाची जबाबदारी घेऊन त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी केला.
केवळ झाडे लावणे पुरेसे नसून,त्यांचे मुलासारखे संगोपन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.आज लावलेले एक रोप उद्याच्या समृद्ध आणि निरोगी समाजाचा पाया ठरेल, त्यामुळे पर्यावरण रक्षणाची सुरुवात स्वतःपासून करा,असे आवाहन डॉ.चलवादी यांनी यानिमित्ताने बोलतांना केले.
संस्थेच्या उपाध्यक्षा ऍड.रेणुका चलवादी यांनी संस्थेच्या आगामी उपक्रमांची माहिती देताना सांगितले की,”निसर्गाचा समतोल राखण्यासाठी केवळ एका दिवसाचा उत्साह नको,तर सातत्य हवे.याच भूमिकेतून शाळेच्या परिसरात पुढील ५ दिवस वृक्षारोपण अभियान राबवले जाईल.” पुढे बोलताना त्यांनी, “प्रदूषणाच्या या काळात वसुंधरेला पुन्हा हिरवाईने नटवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे,” असा संकल्प करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी प्राचार्या स्मिता लोंढे,सायली शिंदे,उप-प्राचार्या बिना कदम,जयश्री कदम,ज्योती सचदेव यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या प्रशासनाने घेतलेल्या या पर्यावरणपूरक पुढाकाराचे परिसरात कौतुक होत आहे.कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेऊन केला.



