ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – तालुक्यातील जोगीसाखरा येथील वनविभागाच्या नर्सरीला आज सकाळी भीषण आग लागून लाखो रुपयांची रोपे व वनसंपदा जळून खाक झाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट किंवा जाळपोळीचा संशय व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी दहा चे सुमारास नर्सरीमधून धूर निघत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. स्थानिक व वनकर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र पाण्याची व साधनांची कमतरता असल्याने आग नियंत्रणात आणता आली नाही.
आगीत सागवान, बांबू, औषधी वनस्पतींसह लाखो रुपयांच्या दुर्मिळ रोपांची नासाडी झाली आहे. शासनाच्या वनीकरण योजनेला यामुळे मोठा फटका बसला आहे.
“दर वर्षी लाखो रुपये खर्च करून रोपे तयार करतो, पण सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. ही वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेली हानी आहे,” असा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
घटनास्थळी आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पोहोचले असून पंचनामा सुरू आहे. आगीचे नेमके कारण व नुकसानाचे मूल्यांकन केल्यानंतरच स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.



