Home Maharashtra औद्योगिक मिथेनॉलचा काळाबाजार थांबवा :- डॉ.हुलगेश चलवादी… — पुणे-पिंपरी दारूकांड प्रकरण,दोषींवर...

औद्योगिक मिथेनॉलचा काळाबाजार थांबवा :- डॉ.हुलगेश चलवादी… — पुणे-पिंपरी दारूकांड प्रकरण,दोषींवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा…

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका

  पुणे :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारूकांड केवळ एक दुर्घटना नसून,पैशांच्या हव्यासापोटी रसायनांचा डोस पाजून केलेला सामूहिक नरसंहार आहे.गेल्या १० वर्षांत देशात ११ हजार,तर महाराष्ट्रात शेकडो गरिबांचे बळी घेणाऱ्या या छुप्या दारूभट्ट्या आणि मिथेनॉलचा काळाबाजाराचा समूळ नायनाट झाला पाहिजे,अशी तीव्र प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केली.

        राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिथेनॉल साठवणूक व विक्रीची विशेष तपासणी मोहीम तातडीने राबवण्याची मागणी देखील त्यांनी केली.

      जिथे कुठे अवैध धंदे सुरू असतील त्यांची माहिती तात्काळ पोलीस आणि आबकारी विभागाला देवून कडक कारवाई करून घ्या,असे आदेश पक्षाचे सर्वेसर्वा ना.रामदास आठवले यांनी दिले असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले. 

      पुणे परिसराला हादरवून सोडणाऱ्या या दारूकांडाचे मृत्यूतांडव अजूनही सुरूच आहे.फुगेवाडीतील दोघे आणि ससाणेनगरातील एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने एकूण मद्यबळींची संख्या आता २२ वर पोहोचली आहे.

       मिथेनॉल-मिश्रित विषारी दारूचे वितरण करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असली तरी आतापर्यंत कर्तव्यावर कसुर करणाऱ्या अधिकार्यांवर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे,असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.

       नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) अधिकृत आकडेवारीनुसार,गेल्या एका दशकात संपूर्ण भारतात विषारी दारू पिऊन ११,००० पेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.देशात दरवर्षी सरासरी १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू या विषारी मद्यामुळे होतो.महाराष्ट्रात २०१५ मधील मुंबईतील ‘मालवणी दारूकांड’ मुळे १०४ जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने कडक पावले उचलल्याचा दावा केला होता.

         परंतु,अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात छोट्या-मोठ्या घटना मिळून ५५० हून अधिक जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे,असे डॉ.चलवादी म्हणाले.

       स्वस्त आणि कडक नशा तयार करण्यासाठी दारूमध्ये ‘मिथेनॉल’ हे घातक औद्योगिक रसायन मिसळले जाते.हे रसायन शरीरात जाताच मानवी अवयव निकामी होतात आणि माणसाला अंधत्व येते किंवा त्याचा तात्काळ मृत्यू होतो. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा मद्यविक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली असली,तरी मिथेनॉलसारख्या रसायनांच्या वितरणावर कायमस्वरूपी कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी डॉ.चलवादी यांनी केली.