दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी-चऱ्होली डॉक्टर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी नुकतीच सर्वसंमतीने बिनविरोध निवडण्यात आली. अध्यक्षपदी डॉ.ज्योत्स्ना आवारी, सचिवपदी डॉ. सचिन सुदडे, उपाध्यक्षपदी डॉ. निखिल सोनवणे तर खजिनदारपदी डॉ. रवींद्र बदरखे यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी पदाधिकाऱ्यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर्समधील समन्वय अधिक दृढ करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
डॉ. ज्योत्स्ना आवारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर म्हणाल्या, “आळंदी-चऱ्होली परिसरातील सर्व डॉक्टरांचा विश्वास आणि सहकार्य हीच आमची खरी ताकद आहे. असोसिएशनच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील सहकार्य, संवाद आणि सेवाभाव अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी विविध आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल. तसेच युवा डॉक्टरांना व्यासपीठ उपलब्ध करून देत सर्व सदस्यांना एकत्र घेऊन संघटनेची वाटचाल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न राहील.”



