Home Maharashtra चामोर्शीच्या कन्येचा मुंबईत सन्मान…

चामोर्शीच्या कन्येचा मुंबईत सन्मान…

दिक्षा कऱ्हाडे

  वृत्त संपादिका

        नुकत्याच नवी मुंबई सानपाडा येथे पार पडलेल्या पारिजात समुहाच्या साहित्य संमेलनात प्रा.सुनंदा पाटील यांचा भव्य सत्कार केला गेला.सुनंदा पाटील ह्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील बाळासाहेब दीक्षित यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत.

         याप्रसंगी त्यांच्या हस्ते उर्मिला बांदिवडेकर यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.तसेच ” एका ज्येष्ठ लेखिकेचा साहित्य प्रवास “या विषयावर त्यांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली. 

            ही मुलाखत पुण्याच्या कवयित्री नंदिनी काळे यांनी घेतली. समुह प्रशासक शबाना मुल्ला यांनी त्यांचा सन्मान केला.

       याच महिन्यात त्यांना अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत.अंतर्गान तर्फे त्यांची ” गझलांकित कवी – सुरेश भट ” यांच्या आठवणींवर आधारीत मुलाखत स्वर्णस्वर बोरीवली मुंबई येथे पार पडली.

            दि.३ मे ला तळेगाव येथे गझलसन्मान आणि ४ मे ला शब्दवेल चा साहित्यिक सन्मान पुणे येथे मिळाला.८ मे २०२६ रोजी मुंबईला सर्वद संस्थेचा प्रतिष्ठेचा ” स्टार लेखिका पुरस्कार ” अभिनेते अरुण नलावडे यांच्या उपस्थितीत प्राप्त झाला.तसेच यावर मानाचा शिरपेच म्हणजे परिजात संस्थेतर्फे झालेला सन्मान ! 

            एका खेड्यातून निघून महानगरात आपले पाय रोवणे,आपला ठसा उमटवणे सोपे नसते. परंतु सुवर्णपदक विजेत्या – स्कॉलर आणि उच्चशिक्षित अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या सुनंदा या चामोर्शीच्या शान आहेत.

         स्वतः च्या भरवशावर,कोणतेही – कुणाचेही पाठबळ नसताना त्यांनी मिळविलेले हे यश अतिशय मोठे आहे.लेखिका – कवयित्री – गझलकार – वक्ता म्हणून त्यांचे स्थान मोठे आहे.सर्व स्तरांतून त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.