राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
आरमोरी :- परिसरात रब्बी हंगामातील धानाची कापणी पूर्ण झाली असून मोठ्या प्रमाणात धान बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र शासनाकडून अद्यापही धान खरेदीसाठी आवश्यक गोदामांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासकीय खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी मजबुरीने आपले धान खुले बाजारात कमी दराने विकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
यासंदर्भात आमदार रामदास मसराम यांनी शासन व संबंधित प्रशासनाला मागणी करत लवकरात लवकर आवश्यक गोदामांची व्यवस्था करून शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात यावा, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच धान खरेदी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही आमदार रामदास मसराम यांनी केली आहे.



