प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
चंद्रपूर (कोसारा) : दिनांक 17 मे 2026 ग्रामीण भागातील शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत, कोसारा (ता. चंद्रपूर) येथे आज वाचनालयाच्या उभारणीचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. ‘मित्रत्व फाउंडेशन, चंद्रपूर’ यांच्या विशेष पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा शैक्षणिक प्रकल्प साकारत आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याचे मुख्य उद्घाटक म्हणून चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कोसारा ग्रामपंचायतीच्या सरपंच रुतिका नरुले, नगरसेवक सुभाष कोसुंगोट्टीवर, काँग्रेस पार्टीचे चंद्रपूर तालुकाध्यक्ष अनिल नरुले, तलाठी अनिल शृंगारे, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन वाघमारे आणि मायबाप सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. कैलास ढेंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागात शिक्षणाची नवी पहाट उजाडावी आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व अभ्यासासाठी दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी मित्रत्व फाउंडेशनने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
तसेच, या आधुनिक वाचनालयाच्या भव्य इमारतीसाठी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला, तर वाचनालयातील अंतर्गत फर्निचर व इतर सुविधांसाठी अतिरिक्त ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले. आमदार महोदयांच्या या मोठ्या घोषणेमुळे कोसारा गावात सर्वसुविधायुक्त आधुनिक ज्ञानकेंद्र उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोसारा आणि परिसरातील स्थानिक पातळीवर सामाजिक व शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी ‘मित्रत्व फाउंडेशन’चे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. गावात वाचनालय व्हावे यासाठी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याचे आज भूमिपूजनात रूपांतर झाले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ऍड.भीमराव आमटे, मनोज कासवटे, करण झामरे, प्रकाश चिवंडे आणि रोशन आघात यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी मित्रत्व फाउंडेशन, चंद्रपूरच्या वतीने उपस्थित सर्व ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.



