राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कूरखेडा-वडसा रोडवर प्रवास करत असताना 108 रुग्णवाहिकेची अत्यंत धोकादायक अवस्था आज दखल प्रतिनिधि यांचे निदर्शनास आली. रुग्णसेवेसाठी धावणाऱ्या या रुग्णवाहिकेच्या मागील दरवाजाला चक्क दोरीचा आधार देण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे कधीही अनुचित घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्यरत असलेली 108 रुग्णवाहिका स्वतःच दुरवस्थेत असल्याचे पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. रुग्णाच्या जीवाशी संबंधित सेवेत अशा प्रकारची निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. प्रवासादरम्यान दरवाजा उघडण्याची शक्यता असल्याने रुग्ण, नातेवाईक तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर रुग्णवाहिका नेमकी कोणत्या रुग्णालयाशी संलग्न आहे, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच 108 समन्वयकांनी (Coordinator) या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन रुग्णवाहिकांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
“रुग्णाला उपचारांसोबत रुग्णवाहिकेलाही उपचारांची गरज आहे,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



