Home Social इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर हेच ‘राष्ट्रकर्तव्य:’- डॉ.हुलगेश चलवादी…   — मेट्रो,बस...

इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर हेच ‘राष्ट्रकर्तव्य:’- डॉ.हुलगेश चलवादी…   — मेट्रो,बस तिकिट दरांवर सवलतीची अपेक्षा….

दिक्षा कऱ्हाडे

  वृत्त संपादिका

     पुणे :- जागतिक स्तरावर निर्माण झालेले इंधन संकट आणि भू-राजकीय तणावामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी या पार्श्वभूमीवर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

        या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची मुंबई मेट्रो-३ (एक्वा लाईन) ने विधानभवन ते धारावी असा प्रवास करीत सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा आदर्श घालून दिला,असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले.इंधन बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर हेच ‘राष्ट्रकर्तव्य’ असल्याचे मत यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केले.

        इराण विरुद्ध अमेरिका-इस्त्रायल युद्धांमुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत असतांना खाजगी वाहनांचा मोह टाळून मेट्रोसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधेचा वापर करणे ही काळाची गरज आहे.

       अप्रत्यक्षरित्या देशाचे परकीय चलन वाचण्यास त्यामुळे मदत होईल.इंधन बचत,सोने खरेदी टाळण्याचे पंतप्रधानांच्या आवाहनामुळे देशाचे परकीय चलन वाचून अर्थव्यवस्था मजबूत होईल.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब करून नागरिकांनी ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारावी,असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.

       भारतासाख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात अशाप्रकारचे निर्णय घेतांना सर्वसामान्यांना याच्या झळा बसणार नाही,याची काळजी घेण्याचे कर्तव्य देखील केंद्र-राज्य सरकारांना पार पाडावे लागेल.देशातील अनेक राज्यांची लोकसंख्या ही जगातील इतर देशांएवढी आहे.

      अशात सरकारने शिस्तबद्ध कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे.सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन करतांना मेट्रो आणि बसचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावेत.

       यासोबतच ‘ग्रीन एनर्जी’चा पर्यायी व्यवस्थेला चालणा देण्याच्या धोरणाला वेग देण्याची आवश्यकता आहे.’लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ अधिक मजबूत करावी.इंधन संकटामुळे मालवाहतूक महागणार असेल तर,सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष सवलती द्याव्यात,असे आवाहन देखील डॉ.चलवादी यांनी केले आहे.

      ग्रामीण अर्थव्यवस्थेवर या आवाहनाचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही,याची विशेष काळजी सरकारला घेणे आवश्यक आहे.शेती तसेच शेतीपुरक जोडधंद्यात इंधनाचा वापर अत्यंत महत्वाचा आहे. अशात कुठल्याही धोरणांचा,निर्णयांचा फटका गरिबांना विशेषतः शोषित-वंचित-पीडित-उपेक्षितांना बसू नये.सर्वसामान्यांना आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी भक्कम करावी आणि पर्यायी ऊर्जा स्त्रोतांना प्रोत्साहन द्यावे,असे डॉ.चलवादी म्हणाले.