Home Maharashtra मौजा शंकरपूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील लिंक समस्येमुळे नागरिक त्रस्त :- उपसरपंच...

मौजा शंकरपूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील लिंक समस्येमुळे नागरिक त्रस्त :- उपसरपंच अशोक चौधरी यांची तात्काळ उपाययोजनांची मागणी…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

      चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत मागील चार दिवसांपासून सतत लिंक फेल असल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. 

       सध्या तीव्र उन्हाळ्याचे दिवस सुरू असून प्रचंड उकाडा व उन्हाच्या तडाख्यात नागरिकांना वारंवार बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत.त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला,शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

           याबाबत अनेक नागरिकांनी उपसरपंच अशोक चौधरी यांच्याकडे येऊन आपली व्यथा मांडली.त्यानंतर उपसरपंच अशोक चौधरी यांनी स्वतः महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.यावेळी बँकेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून आली.अनेक नागरिक सकाळपासून उन्हात उभे राहून व्यवहारासाठी प्रतीक्षा करत होते.

      विशेष म्हणजे काही वृद्ध महिलांना चालत येणे शक्य नसल्यामुळे त्यांना मोठ्या वाहनातून बँकेत आणावे लागत आहे.अशाच एका वृद्ध महिलेचा वाहनात बसून प्रतीक्षा करत असतानाचा फोटो सुद्धा समोर आला असून त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टांचे वास्तव चित्र दिसून येत आहे.

       बँकेतील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता “लिंक नसल्यामुळे कामकाज बंद आहे” असे उत्तर देण्यात आले.मात्र नागरिकांना समाधानकारक माहिती किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. 

      एवढ्या तीव्र उन्हातही बँकेमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.सामान्य नागरिकांचे पैसे,शेतकऱ्यांचे व्यवहार,पेन्शनधारकांचे काम,विद्यार्थ्यांचे आर्थिक व्यवहार यासाठी ही बँक अत्यंत महत्त्वाची असून चार दिवसांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

      यासंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन लिंक समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी,नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच बँकेचे कामकाज सुरळीत सुरू करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात,अशी मागणी उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.

       तसेच नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून योग्य तो तोडगा काढावा,अन्यथा नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.