दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीत खेड तालुक्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले असून, माजी आमदार ताराचंद वडगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवून इतिहास घडविला, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही केवळ राज्य निर्मितीची लढाई नसून मराठी अस्मितेच्या जतनाची चळवळ होती. खेड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जनजागृती व आंदोलनांतून मोठे योगदान दिले. ताराचंद वडगावकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी या लढ्यात प्रभावी भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य लिपिका सुजाता रंधवे यांच्या उपस्थितीत व प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच औचित्याने संस्थेचे खजिनदार डॉ.दीपक पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा थाटात संपन्न झाला. त्यांच्या कार्याचा गौरव करत शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बुद्ध पौर्णिमेनिमित्तही विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले, तर आभार वैशाली शेळके यांनी मानले.



