दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर ३० एप्रिल – शहराच्या सौंदर्यवृद्धीसाठी खनिज निधीतून हाती घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वृक्षारोपण,सौंदर्यीकरण तसेच कोरीव कामाच्या विकास कामांना महापौर संगीता खांडेकर यांच्या विशेष प्रयत्नांतून गती मिळाली असून, या विकास कामांचे भूमिपूजन उद्या दिनांक १ मे रोजी सकाळी ९.०० वाजता पालकमंत्री श्री. अशोक ऊईके यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महापौर संगीता खांडेकर यांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तयारीचा सखोल आढावा घेतला.यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध,सुरळीत व दर्जेदार पद्धतीने पार पाडण्याचे कडक निर्देश दिले.याप्रसंगी उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे,सभागृह नेता जयश्री जुमडे,आयुक्त अकुनुरी नरेश उपस्थीत होते.
कार्यक्रमस्थळी स्वच्छता,सुशोभीकरण,वाहतूक नियंत्रण,नागरिकांसाठी आवश्यक सुविधा,तसेच सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये,यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे,असे महापौरांनी स्पष्टपणे सांगितले.
तसेच हाती घेतलेल्या विकास कामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देत ती वेळेत पूर्ण करावीत व त्यांची नियमित देखभाल सुनिश्चित करावी,असेही निर्देश त्यांनी दिले.
नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावे,असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.




