राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
कूरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता दि २३ एप्रील पासून बेमुदत कामबंद आंदोलन सूरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
आज दि ३० एप्रील रोजी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी शिष्टाई करीत प्रशासनाशी कामगारांची चर्चा घडवून आणली व चर्चेअंती त्यांचे थकीत वेतन अदा करीत या प्रश्नावर तात्पुरता तोडगा काढलाय.यामूळे संपावर असलेले कामगार उद्या शूक्रवार पासून पूर्ववत कामावर रूजू होतील अशी माहिती नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिली आहे
शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट शहरातीलच एका बचत गटाला देण्यात आले आहे.मात्र सदर कंत्राट प्रक्रिया राबविताना काही तांत्रिक अडचणींमुळे मागील दोन महिण्याचे बिल अटकले होते.त्यामुळे कामगारांना वेतन अदा करता आले नाही व त्यानी कामबंद आंदोलन पुकारले होते.
आंदोलन सूरू झाले त्याचवेळी एक महिण्याचे वेतन नगदी अदा करीत कामगारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.मात्र कामगारांचे समाधान न झाल्याने त्यांनी आंदोलन तिव्र केले.
काल आंदोलकांची आझाद समाज पक्षाचे राज,माकपाचे अमोल मारकवार व आपचे नसिर हाशमी यानी भेट घेत पदाधिकारींशी चर्चा केली होती.अखेर आज नगराध्यक्ष अनिता बोरकर,उपाध्यक्ष बबलू हूसैनी,आरोग्य सभापती सागर निरंकारी,महिला व बालकल्याण सभापती कांताबाई मठ्ठे,नगरसेवक जयेंद्र चंदेल,आशाताई तूलावी,हेमलता नंदेश्वर,अतूल झोडे यानी शिष्टाई करीत प्रशासनाशी व कामगारांची चर्चा घडवून आणली.
यावेळी थकीत एक महिण्याचे वेतन त्याना तत्काळ अदा करण्यात आले.त्यामूळे कामगारांनी संप मागे घेतला व शूक्रवार पासून सर्व कामगार कामावर रूजू होणार असल्याची माहिती नगर पंचायत पदाधिकार्यानी दिली आहे.
वरिल बचत गटाच्या निविदेत काय तांत्रिक अडचणी आहेत,त्या आता प्रभारी मुख्याधिकारी यांचे निदर्शनात आली,तत्कालिन मुख्याधिकारी यांचे निदर्शनात का आली नाही?,निविदा प्रक्रीया संभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ती मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनात का आणुन दिली नाही? हा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या जरी तोडगा निघाला असला तरी,सदर बचत गटाला घन कचऱ्याचे काम देण्याचे काम कुठल्या पद्धतीने झाले,त्याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.



