Home क्रीडा अधिरा करंडक पर्व २ ला दमदार सुरुवात,आळंदीत प्रथमच नाईट क्रिकेट स्पर्धा…

अधिरा करंडक पर्व २ ला दमदार सुरुवात,आळंदीत प्रथमच नाईट क्रिकेट स्पर्धा…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : शहरात प्रथमच प्रकाशझोतात आयोजित करण्यात आलेल्या ‘अधिरा करंडक पर्व २’ या क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. आधुनिक प्रकाशझोतात खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

          यावेळी उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, माजी सभापती डि.डि.भोसले पाटील, नगरसेविका पूजा घुंडरे, अरुणा घुंडरे तसेच नगरसेवक संतोष रासकर, सोमनाथ कुऱ्हाडे, दिनेश घुले, गोविंद कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

         विरोधीपक्षनेते आदित्य घुंडरे, नगरसेविका ऋतुजा घुंडरे तसेच कैवल्य एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मयुर घुंडरे यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर क्रीडेला चालना देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा भरविण्यात येत असल्याचे आयोजक नगरसेवक आदित्य घुंडरे यांनी सांगितले.

         स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला असून प्रत्येक सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. रात्रीच्या प्रकाशझोतात रंगणारे सामने हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. विजेत्या व उपविजेत्या संघांसाठी आकर्षक बक्षिसांची खैरात ठेवण्यात आली असून उत्कृष्ट खेळाडूंनाही वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार आहेत.

        त्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आगामी दिवसांत सामने अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.