Home Maharashtra पिंपळागाव (हलबी) हे मातीशी नातं जपणारं समृद्ध गाव….

पिंपळागाव (हलबी) हे मातीशी नातं जपणारं समृद्ध गाव….

लक्षवेधी 

शब्दांकन

रोशन मेश्राम

(प्रशिध्दीसाठी राजेंद्र रामटेके विशेष प्रतिनिधी यांनी पाठविले आहे.)

    गाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते मातीचा सुगंध,शेतातील हिरवळ, माणुसकीची ऊब आणि आपलेपणाची भावना. 

     अशाच ओळखीचं एक नाव म्हणजे पिंपळागाव (हलबी). आज परिसरात हे गाव सधन, मेहनती आणि एकजुटीचं गाव म्हणून ओळखलं जातं.

      या गावाची खासियत म्हणजे इथली सामाजिक एकता. गावात SC, ST, OBC आणि NT प्रवर्गातील लोक वास्तव्यास आहेत.परंतु सर्वाधिक संख्या हलबी आदिवासी समाजाची आहे.

      विविध समाजाचे लोक असूनही गावात भेदभावाची भिंत नाही,उलट गुण्यागोविंदाने, सुख-दुःख वाटून घेण्याची परंपरा आजही जिवंत आहे.

      पिंपळागावची खरी ओळख आहे ती शेती.इथल्या मातीत कष्टाचं सोनं होतं.धान,मक्का,कारली,मिरची आणि पालेभाज्या ही इथली प्रमुख पिकं.

      शेतकरी पहाटेच्या दवबिंदूपासून संध्याकाळच्या सूर्यास्तापर्यंत राबतो आणि आपल्या घामातून कुटुंबाचं भविष्य घडवतो.

      सुमारे 1000 ते 1100 लोकसंख्या असलेलं हे गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम मानलं जातं. 

     गावात जवळपास 45 ते 50 ट्रॅक्टर आहेत,हेच गावाच्या शेतीप्रधान समृद्धीचं प्रतीक आहे.अनेक घरांमध्ये एक-दोन नव्हे तर दोन-तीन मोटारसायकली दिसतात. हे चित्र गावाच्या प्रगतीची साक्ष देतं.

     मात्र,या प्रगतीसोबत एक वास्तवही आहे – गावातील शिक्षणाची गंगा अजूनही तितकी खोलवर वाहताना दिसत नाही.नोकरीत गेलेले लोक मोजकेच,हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत.बहुतेकांची वाट शेतीकडेच वळलेली आहे.कारण गावाचा आत्माच मातीशी जोडलेला आहे.

       पिंपळागाव म्हणजे फक्त घरे,रस्ते किंवा शेती नाही; तर ती एक संस्कृती आहे,एक परंपरा आहे.इथल्या लोकांच्या कष्टात ताकद आहे,नात्यांत ऊब आहे आणि जमिनीशी असलेलं नातं खूप घट्ट आहे.

      आज पिंपळागाव समृद्ध आहे,उद्या शिक्षणाची जोड मिळाली तर हे गाव फक्त परिसरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून उभं राहू शकतं.

     कारण इथली माती सुपीक आहेच पण इथल्या माणसांची मनंही तितकीच सुपीक आहेत.

पिंपळागाव (हलबी) – मेहनत, एकता आणि समृद्धीची जिवंत कहाणी…….

                शब्दांकन

            …… रोशन मेश्राम….