Home देशविदेश कुटुंबाची आवश्यकता आणि गुणदोष…

कुटुंबाची आवश्यकता आणि गुणदोष…

     समाज विकासाच्या पहिल्या टप्प्यात माणसे (स्त्रीपुरूष) जनावराचे जीवन जगत होती.जंगलातील हिंस्र प्राणी जसे एक एकटेच जंगलात फिरत,अहिंसक प्राण्यांची शिकार करून आपले पोट भरत असत.लैंगिक भूक भागवण्यासाठी कुणीही केव्हाही कुठेही कसेही स्त्री पुरुष समागम होतसे.त्यावेळी लैंगिक स्वातंत्र्याची संकल्पना नव्हती,तर लैंगिक स्वैराचार होता.समाजाच्या विकासाचा नव्हे पण मानवी प्राण्यांच्या जीवन जगण्याचा हा पहिला टप्पा किंवा पहिली पायरी होती.

    मानवी प्राण्याची ‘ प्राणी ‘ या अवस्थे कडून ‘ समाज ‘ या अवस्थेकडे वाटचाल झाली.त्यातून काही स्त्रीपुरूष जंगली हिंस्त्र प्राण्यापासून बचाव होण्यासाठी एकत्र राहू लागली,यास माणसाची ‘ टोळी अवस्था ‘ टोळी जीवन असे म्हणतात.सामूहिक शिकार करून उदर निर्वाह करणे,एकत्रितच राहणे,खाणे,या अवस्थेत विवाह संस्कार नसल्यामुळे कुणीही स्त्रीपुरूष कुणाही सोबत समागम करून आपली काम वासना तृप्ती करून घ्यायचे.या अवस्थेत योनीसुचिता आणि पावित्र्य आणि नैतिकतेचा उदय झाला नव्हता.लैंगिक स्वातंत्र्याला मान्यता होती, समागम मधून झालेली मुले ही एका व्यक्तीची नसून त्या टोळीची समजल्या जात होती.त्यांचे भरण पोषण संरक्षण ची जबाबदारी ही टोळीची होती.

   समाज विकासातील तिसरा टप्पा,पायरी,अवस्था म्हणजे शेती व्यवसाय.शेतीचा शोध लागला म्हणून जिथे शेती तिथे वास्तव्य,घरे,स्थापित झाली.तिसऱ्या टप्प्यात पुरुष शिकार करायचे,तर स्त्रिया न भटकता शेती,त्यातील कामे, पीक संरक्षण करायला लागले. चूल मुल हे काम स्त्रियाच करू लागल्या.थोडक्यात शिकार करणे,शेती करणे हे दोन व्यवसाय समाविष्ट असलेला टोळी समाज,म्हणजे समाज विकासाचा तिसरा टप्पा होय.

     चौथ्या टप्प्यात मात्र शिकार करणे थांबले,म्हणून भटकणे थांबले,आणि टोळी समाज स्थिरावला.या टप्प्यात फक्त शेती व्यवसाय सुरू झाला.अधून मधून केंव्हातरी शोक म्हणून छंद म्हणून पुरुष एकटा किंवा समूहाने शिकार करू लागले.पण केंव्हातरीच.नेहमी नाही.मानवी समाजात अनेक टोळ्या निर्माण झाल्या होत्या.सारी पृथ्वी,( जमीन ) निसर्ग,जंगल,वृक्ष हे कुणाच्याही मालकीची नव्हती,ज्या टोळीला जेव्हढी शेती करायची तेव्हढ्या जमिनीवर ताबा करणे सुरू झाले.लोकसंख्या अत्यंत कमी,आणू जमीन अफाट,ज्याला जेव्हढे पाहिजे तेव्हढे मिळायचे.कारण त्यावेळी जमीन जंगल याचा कुणी मालकच नव्हता,त्यावेळी राजे किंवा सत्ता नावाची संकल्पना नव्हती.सामूहिक राहणे,सामूहिक शेती करणे,सामूहिक भोजन करणे,आणि लैंगिक भूक भागविण्यासाठी समूहातील आपापल्या संमतीने कुणाशीही समागम करणे,शासनमुक्त आणि शोषणमुक्त साम्यवादी समाज व्यवस्था होती.

   या नंतर चौथी समाज व्यवस्था ,म्हणजे समाज विकासाची पायरी म्हणजे कुटुंबव्यवस्था.ही खाजगी मालमत्तेचा हक्क आणि तिचे संरक्षण यातून निर्माण झाली.

    सामूहिकपणे जमीन कसण्या ऐवजी प्रत्येक माणूस जंगलातील झाडे तोडून तिथे शेती करू लागला.तिच्यावर स्वतःचा हक्क सांगायला लागला.म्हणजेच उत्पादनाचे साधनांवर खाजगी मालकी प्रस्थापित झाली.शेतीतून निर्माण होणारे उत्पादन,आणि मालकीच्या जंगलातून मिळणारी फळे,लाकडे,यावर मालकी हक्क,सांगणे सुरू झाले.पोटाची भूक जंगल जमीन पाणी चे मालकीतून भागली,आणि शारीरिक भूक ही दोघांचीही असल्याने आपोआप स्त्रीपुरूष दोघे एकत्र आले.दोघे एकत्र येणे,निवास करणे,स्वतंत्र राहणे,शांततामय जीवन वाटायला लागले.आणि यातून लग्न न करताच फक्त दोघेजण एकत्र राहणे सुरू झाले.त्यांचे स्वतंत्र राहणे,जगणे,व्यवसाय करणे,घर करणे,मुलांना जन्म देणे सुरू झाले.म्हणजेच कुटुंब पद्धतीस सुरुवात झाली.ही समाज विकासाची चौथी पायरी किंवा टप्पा होय.परंतु पुढे चालून राज्यशाहीस सुरुवात झाली.तेंव्हा त्या राजाने कसणाऱ्याची जमीन त्याचे नावे नोंदण्याचे ठरविले,तेंव्हा मात्र पुरुषाने चलाकी केली,धूर्तपणा केला,जमीन स्त्रीचे नावे न लावता,आपले नावाने नोंदविली.आणि तो मालक झाला.

   आपल्या कब्जातील जमीन जंगल पाणी यावरील आपली मालकी आपण मेल्यानंतरही आपलीच म्हणजे आपल्या कुटुंबीचीच राहावी,किंवा ती वारसाहक्काने आपल्या मुलांना ( वंशालाच ) रहावी,म्हणून आपल्या सोबत राहणाऱ्या स्त्रीपासून होणारे मुल हे कुणाचेही असता कामा नये,ते आपलेच असले पाहिजे,यासाठी आपले सोबत राहणारी स्त्री म्हणजे सहचारिणी हिच्यावर कुणाचाही हक्क नसावा,जमिनी प्रमाणे तीला पण आपलेच नाव लागले पाहिजे.आणि तिच्यापासून होणारे मुलास आपलेच नाव लागले पाहिजे.यासाठी स्त्रीवर आपला मालकी हक्क पाहिजे,त्यावर इलाज ( उपाय ) म्हणजे तिच्याशी विवाह करायचा,म्हणजे तिची नजर कुणावर जाणार नाही,आणि तिच्याकडे कुणीही पाहताना ही त्याची बायको,त्याच्या हक्काची मालकीची ‘ म्हणून पाहतील.यासाठी लग्नाची रूढी दृढ करण्यात आली.तसेच पुरुषाने ब्रह्मचर्य पाळावे,म्हणजे पत्नीशिवाय इतर स्त्रीवर नजर टाकू नये.तसेच स्त्रीने पातिव्रत्य पालन करावे.असा नियम केल्या गेला.आणि इथेच श्रीपुरुष्याचे नैसर्गिक लैंगिक स्वातंत्र्यावर बंधन आले.केवळ खाजगी मालमत्तेच्या हक्कासाठी.

    समाजविकासाच्या प्रक्रियेत माणसाचा स्वार्थ आणि मोह माणसाला सामूहिक जीवनाकडून स्वार्थी जीवनाकडे ,व्यापक जीवना कडून संकुचित जीवनाकडे घेऊन गेला.त्यातून तो कुटुंब कोषात स्वतःला बंदिस्त करून घेतला.माणूस एव्हढा आत्मकेंद्रित झाला की,एकत्रित कुटुंबातून तो ” हम दो हमारे दो ” वर आला.तेथून हम दो हमारा एक,आता तर एक पण नको.पण प्रॉपर्टी मात्र भरपूर पाहिजे.मौज मजा करणे, ऐश्वर्यात जीवन जगत मरणे,एवढेच ध्येय उरले आहे.समाज , सामूहिकता,समाजासाठी जगणे तर दूरच पण सामूहिक जीवन जगणे पण नको वाटायला लागले आहे.एव्हढा माणूस संकुचित आणि आत्मकेंद्रित झाला आहे.या विचाराचा आणि जीवन पद्धतीचा एव्हढा दुष्परिणाम झाला आहे की,संपत्तीच्या लोभापायी तो श्रीमंता ची सत्तेची तो गुलाम होऊन पण राहायला तयार आहे.

      समाजविकासाच्या प्रक्रियेत माणूस सुरक्षा म्हणून कुटुंब व्यवस्थे पर्यंत पोहचला आहे.कुटुंबसंस्थेत माणूस स्थिरावला.कारण प्रेम विश्वास सुरक्षा,शांती,सुख,काळजी घेणारे कुटुंबात मिळाले.म्हणून स्त्रीपुरूष स्थिर झाले.भौतिकदृष्ट्या स्थिर झाले ,पण मानसिकदृष्ट्या अस्थिरच राहिले.त्याचे कारण त्यांच्या स्वातंत्र्याची कुचंबणा हे होय.आणि दुसरे कारण अमर्याद स्वार्थ,म्हणजे मोह.

    स्वार्थी पुरुषाला संपत्तीचा मोह आवरता आला नाही,आणि मिळवलेली संपती मेल्यावरही आपलीच रहावी,आपल्याच रक्ताच्या ,वंशाला मिळावी,वंशाचा दिव्याची खात्री साठी पुरुषांनी स्त्रीवर अन्याय केला.स्त्रीपुरूष समानतेचे,स्त्रीस्वातंत्र्याचे मूल्य तत्व पायदळी तुडविले.पुरुषाला एकावेळी चार पण बायका करता येतात,पण स्त्रीने मात्र एकच नवरा करायचा ही दुटप्पी पुरुषी धोरण,पुरुष बायकोकडून समाधान नाही झाले,किंवा शोक म्हणून,किंवा अजून काही कारण असेल तर बाहेरच्या स्त्रीशी संबंध ठेवता येतो,पण पत्नीस तो अधिकार नाही,ती पातिव्रत्य जोपासले पाहिजे,विधवा झाली तरी लग्न करू नये,म्हणजे दुसऱ्याची होऊ नये.कारण लग्न म्हणजे देवाने आणि दैवाने घालून दिलेली गाठ होय,पातिव्रत्य भंग म्हणजे पाप.असे धार्मिक शिकवण देऊन स्त्रीवर या कुटुंबसंस्थेने अन्यायच केला आहे.स्त्रीपुरूष समानतेचे तत्व पायदळी तुडविले आहे,दया माया क्षमा हे धार्मिक तत्व या कुटुंबामुळे उध्वस्त झाले.स्त्री सबला असूनही या कुटुंबामुळे अबला झाली.तिने स्वतःतील आत्मविश्वास,धैर्य,कर्तृत्व,स्वतःचे कौशल्य,स्वावलंबन,व्यक्तिमत्व गमविले. केवळ वंशाच्या दिव्या साठी.

  खरेतर स्त्रीचे शरीर हे तिची खाजगी संपती आहे,त्यावर फक्त तिचाच अधिकार आहे.त्यामुळे तिच्या परवानगी शिवाय लग्नाच्या नवऱ्याला सुद्धा तिच्या मनाविरुद्ध स्पर्श करण्याचा अधिकार नाही.परंतु विवाहाचे कारण सांगून अनेक पती स्त्रीची इच्छा नसताना तिच्या शरीराशी जबरदस्ती करतात.हे अन्यायकारकच होय.पुरुषासारखेच स्त्रीला पण मन आहे, कामोत्तेजना हा नैसर्गिक स्वभावधर्म आहे,नवऱ्याकडून हा धर्म निभावल्या गेला नाही,किंवा नवरा मेल्यावर तिने मनाला मारायचे का ? याचे उत्तर ही कुटुंबसंस्था भावना मारायला सांगते.आणि इथेच विकृती निर्माण होते,आणि विकृतीचे वातावरण तयार होते.अर्थात ही विकृती नव्हे तर अडवलेल्या प्रवाहास वाट करून देणे होय.यासच स्त्रीचे लैंगिक स्वातंत्र्य असे म्हणतात.विचार स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य यापैकीच हे एक लैंगिक स्वातंत्र्य होय.ज्या स्वातंत्र्यावर सारे जग निर्माण झाले आहे.या स्वातंत्र्यावर बंधने आल्यामुळेच जगातील स्त्रिया एकत्र येत आहेत,संघटित होऊन संघर्ष करताहेत.यासच ‘ स्त्रीमुक्तीचा लढा ‘ असे नाव पडले आहेत.लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. तो त्यांना करायचा पण नाही.परंतु हा स्वैराचार लैंगिक स्वातंत्र्यावर बंधन टाकल्यामुळेच सुरू झाला.हे स्वातंत्र्य मिळताच स्वैराचार नक्कीच बंद होणार आहे.कारण कोणत्याही पदार्थास किंवा गोष्टीस दाबून ठेवले की,त्याचा स्फोट होतो.भावनेला दाबल्याने तर ज्वालामुखीच होते.कारण भावना अशी शक्तिमान आहे की,तिला कुणीही थोपू शकत नाही.ती एक तर जीव घेते,नाहीतर जीव देते.एव्हडी भयावह आहे.म्हणूनच कालौघात समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेत आता कुटुंबसंस्थाना सुद्धा धक्के लागताहेत.वेळीच नाही सावरलो, जागे झालो,उपाय नाही शोधला तर एकेकाळी ही कुटुंब व्यवस्था पण उध्वस्त होणार आहे.यासाठी यावर उपाय हाच होऊ शकतो की,वर्तमान परिस्थितीत बराच बदल झाला आहे.आता स्त्रिया कामासाठी,नोकरीसाठी घराबाहेर पडल्या आहेत.दिवसभर घराबाहेरच असतात.त्यांचा अनेक पुरुषाशी संबंध सहवास येतो.म्हणून पुरुषांनी आता संशय घेणे बंद केले पाहिजे.तिच्यातील सुप्त गुणाला वाव दिला पाहिजे.शिवाय आजच्या महागाईला एकाचा पगार पुरत नाही.म्हणून दोघांनाही काम करावे लागते. काळ बदलला,काळाबरोबर आपणही बदलले पाहिजे.जुन्या कल्पना,विचार,रूढी सोडल्या पाहिजेत.स्त्री मनाचा विचार केला पाहिजे.पती पत्नीने परस्पर सामंजस्याने ( एकमेकांचे विचार समस्या जाणून घेणे ,) आणि एकमेकांचा आदर करणे,आणि परस्परांच्या यौन आचरणाचा पण विचार करणे आवश्यक आहे.थोडक्यात कुटुंबातील लवचिकता महत्वाची आहे.ही काळाची गरज आहे.याचे भान आले तरच कुटुंब टिकेल.

             लेखक

            दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

    दिनांक : 24 एप्रिल 2026, फोन : 9420912209