शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षणाची जवळपास दहा वर्षे एकत्र घालवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी इतरत्र जाताना मनात घालमेल असते.जुन्या आठवणी मनात रेंगाळत राहतात.शाळेतील दिवस आठवत राहतात.हा आठवणींचा ठेवा अनमोल असतो.विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात अभ्यास करून यश प्राप्त करावे आणि या अनमोल आठवणींना प्रगतीचे पंख द्यावे करावे असे प्रतिपादन लेखक सुरेश डांगे यांनी विद्यार्थी निरोप समारंभ प्रसंगी केले.
चिमूर तालुक्यातील गदगाव केंद्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव (बेगडे) येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि नव्याने दाखल होणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय बुजाडे होते.निरोप समारंभाचे उद्घाटन नगरसेवक रवी सावसाकडे यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा हेमलता सातपुते,केंद्रप्रमुख ताराचंद दडमल,मुख्याध्यापक प्रफुल्ल बंडे,लेखक सुरेश डांगे,विजय निनावे,मारोती नन्नावरे,सुनील बुधे,सुनील गायकवाड,गोवर्धन ढोक,शुभांगी चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन करुन झाली.उपस्थित अतिथीनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन केले.
शाळेत नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय आठवणींना उजाळा दिला.
प्रजासत्ताक दिन,स्वातंत्र्य दिनाला इंग्रजीतून प्रभावी भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपाध्यक्ष हेमलता सातपुते यांच्या वतीने नोटबुक व पेन बक्षीस देण्यात आले.
निरोप घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रकाश कोडापे सहायक शिक्षक यांचेकडून त्यांच्या स्वतःच्या संघर्ष या स्वरचित काव्यसंग्रहाची भेट देण्यात आली.त्यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कोडापे यांनी केले.सूत्रसंचालन अनुष्का नन्नावरे हिने केले तर उपस्थितांचे आभार श्रृती नन्नावरे हिने मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.



