राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
आदिवासी विकास महामंडळ द्वारे आ. वि.का. सह. संस्थेच्या वतीने तालुक्यातील धान खरेदी केंद्रांवर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे प्रलंबित चुकारे त्वरित अदा करावेत, अशी मागणी भा ज पा पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडाचे उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज गडचिरोली येथे दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हात तसेच कुरखेडा तालुक्यात १ डिसेंबरपासून सुरू झालेल्या धान खरेदी प्रक्रियेत लाखो क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे चुकारे प्राप्त झाले. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांनी धान विक्री करून बरेच दिवस उलटूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. काही शेतकऱ्यांना चुकारे मिळाले असले तरी मोठ्या संख्येने शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत.
प्रलंबित चुकारांमुळे काही शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करता आलेली नाही.परिणामी त्यांच्यावर व्याजाचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. याशिवाय, आगामी खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रलंबित चुकारे त्वरित देण्यासोबतच आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या आवारात साठवलेले धान्य तातडीने उचलावे, तसेच संस्थांचे प्रलंबित मंडी लेबर चार्जेस व कमिशनही लवकरात लवकर अदा करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या वतीने करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देतांना गडचिरोली विधानसभा चे आमदार मिलिंद नरोटे, शहर उपाध्यक्ष मंगेश रणदिवे, कुरखेडा तालुका महामंत्री विनोद नागपुरकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



