Home Social मित्रत्व फाउंडेशन, चंद्रपूरतर्फे कोसारा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती उत्साहात साजरी…

मित्रत्व फाउंडेशन, चंद्रपूरतर्फे कोसारा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती उत्साहात साजरी…

 प्रेम गावंडे

 उपसंपादक

दखल न्युज भारत

           मित्रत्व फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या वतीने कोसारा गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

         या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन प्रमुख स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तर विद्यार्थ्यांच्या कला व अभिव्यक्तीला वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दोन्ही स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपले कौशल्य सादर केले.

             स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कोसारा गावच्या सरपंच रुतिका नरुले यांनी विजेत्या स्पर्धकांना भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका भेट देऊन त्यांचा विशेष सत्कार केला. तसेच मित्रत्व फाउंडेशनच्या अध्यक्षांना भारतीय संविधानाची प्रत प्रदान करण्यात आली.

            या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच रुतिका नरुले उपस्थित होत्या. तसेच ग्रामपंचायत सदस्य स्वाती आमटे, अरुण तुरे, रोशन अलोने, मनोज कासवाटे, डॉ. सुमित भगत यांच्यासह माजी उपसरपंच संतोष आघात व मनोज भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले व शिक्षण, समता आणि संविधानिक मूल्ये अंगीकारण्याचे आवाहन केले.

          कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मित्रत्व फॉउंडेशन च्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे योगदान दिले.

           या उपक्रमामुळे गावात शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणाला चालना मिळाली असून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण झाली आहे.