रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/वर्धा
मारेगाव :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी ‘समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे.
शासन आपल्या दारी…
उपक्रमाचा मुख्य हेतू ‘समाधान शिबिर’ हा शासनाचा नागरिकाभिमुख उपक्रम असून विविध शासकीय सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. नागरिकांना तहसील व इतर शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच त्यांच्या तक्रारी व प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा व्हावा, यासाठी हे शिबिर आयोजित केले जाते.
या उपक्रमातून प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवाद साधून कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक करण्यावर भर दिला जात आहे.
विविध विभागांचा सहभाग या शिबिरात परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या विविध समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्यात येणार असून महसूल विभागासह इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महसूल सेवा एकाच छताखाली…
शिबिरामध्ये ७/१२ उतारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, भूमापन, विविध दाखले व प्रमाणपत्रे तसेच प्रलंबित महसूल प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. याशिवाय संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, निवृत्ती वेतन योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व लाभ वितरण करण्यात येणार आहे.
आरोग्य तपासणीची विशेष सोय…
आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांची सर्वसाधारण तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन चाचण्या करण्यात येणार असून लहान मुले व गर्भवती महिलांची तपासणी केली जाणार आहे. आवश्यक रुग्णांना मोफत औषधोपचार व सल्ला देण्यात येणार असून गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. तसेच लसीकरण, पोषण आहार व स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.
उपस्थितीचे आवाहन…
तहसील कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ‘समाधान शिबिरा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



