लक्षवेधी
युवराज डोंगरे
उपसंपादक/खल्लार…
दर्यापूर शहरातील आठवडी बाजार हा नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो.मात्र या बाजाराकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे.
विशेषतः बाजाराच्या दिवशी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती आणखी बिकट होत असते.तरीही संबंधित विभागाकडून या समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांकडून अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत असून तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.सदर रस्त्याच्या मधोमध खड्डे निर्माण झाले असून त्यामधून दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत.तरी या महत्त्वाकांक्षी बाबीची दखल घेऊन संबंधित विभागाने ताबडतोब रस्त्याची डागडुजी करावी,अशी नागरिकांची मागणी आहे.



