Home Maharashtra आंबेडकर विचारांनी प्रेरित, शिस्तबद्ध व प्रबोधनात्मक जयंती साजरी करूया :- नगराध्यक्ष प्रशांत...

आंबेडकर विचारांनी प्रेरित, शिस्तबद्ध व प्रबोधनात्मक जयंती साजरी करूया :- नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे… — आळंदीत आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि शिक्षण या मूल्यांवर आधारित विचारसरणी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. जयंती हा केवळ उत्सव नसून समाजप्रबोधनाचा दिवस आहे. त्यामुळे सर्वांनी अनुशासन पाळत, सामाजिक सलोखा जपत आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातून आंबेडकर जयंती साजरी करावी,” असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केले.

         आळंदी शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच उत्सव शांततामय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी आळंदी पोलीस प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने आळंदी पोलीस कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये शांतता समितीची सविस्तर बैठक पार पडली.

           आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.नरके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, शांतता समिती सदस्य डि.डी.भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, उत्तम गोगावले, अजित वडगावकर, संदीप रंधवे, डॉ.निलेश रंधवे, आनंदराव मुंगसे, अर्जुन मेदनकर, मच्छिंद्र शेंडे, निसारभाई सय्यद तसेच आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील विविध आंबेडकर जयंती उत्सव मंडळांचे प्रतिनिधी व इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          बैठकीत जयंतीनिमित्त होणाऱ्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिकांचा मोठा सहभाग लक्षात घेऊन सुरक्षात्मक व प्रशासकीय उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मिरवणुकीचे मार्ग निश्चित करणे, संवेदनशील ठिकाणांची ओळख पटवून त्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची आखणी करणे तसेच ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

         शहरातील सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून आंबेडकर जयंती उत्सव शांततेत, शिस्तबद्ध व विचारप्रबोधनात्मक वातावरणात साजरा करावा, असे आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.नरके यांनी केले.