दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
उस्मानाबाद :- अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील गोसावी समाजातील बाबू जाधव कुटुंबाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.या प्रकरणी तातडीने कारवाई करून मुलीचा शोध घ्यावा,अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
बाबू जाधव हे उदरनिर्वाहासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे वास्तव्यास आहेत.फिरस्ती करून अत्तर विक्री हा त्यांचा व्यवसाय असून,लोहारा शहरात झोपडी करून ते कुटुंबासह राहतात.त्यांच्या कुटुंबात दोन मुले आणि तीन मुली आहेत.भटक्या समाजातील हे कुटुंब रोज शहरात फिरून अत्तर विक्री केल्याशिवाय उदरनिर्वाह करू शकत नाही.
12 जानेवारी 2026 रोजी सकाळी मोठी मुलगी किराणा आणण्यासाठी घराबाहेर गेली.मात्र ती दिवसभर परतली नाही. आई-वडिलांनी सर्वत्र शोध घेतला,नातेवाईकांशी संपर्क साधला,तरीही तिचा पत्ता लागला नाही.अखेर लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.संबंधित किराणा दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार,मुलीने त्यांचा फोन वापरून एका मुलाशी संपर्क साधला आणि तो मुलगा तिला तेथून घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
सदर मुलगी 13 वर्षे 9 महिने वयाची असून अल्पवयीन आहे.त्यामुळे संबंधित मुलाचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी,अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.मुलीचा शोध लागला नाही तर उस्मानाबाद येथे मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा राज्य प्रवक्ते ॲड. नगरसेवक अरुण जाधव यांनी दिला.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के,महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे,युवकाध्यक्ष शितल चव्हाण,जिल्हा महासचिव नसीर शेख,जिल्हा उपाध्यक्ष महादेव एडके,जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंदुरकर,विधी सल्लागार ॲड.के.टी.गायकवाड,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कुंदन वाघमारे, जिल्हा संघटक कश्यप बनसोडे,युवक सदस्य जीवन कदम,मिलिंद रोकडे,मच्छिंद्र जाधव,अक्कलकोट तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे,विद्यार्थी संघटना राज्यपूर्वक्ता रविराज पोटे,यशवंत इंगळे,हनुमंत जाधव तसेच उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



