Home Maharashtra गडचांदूर प्रदूषणप्रश्नी चौकशी करा :- आमदार अभिजीत वंजारी यांची सभागृहात मागणी…

गडचांदूर प्रदूषणप्रश्नी चौकशी करा :- आमदार अभिजीत वंजारी यांची सभागृहात मागणी…

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

मुंबई :- महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदस्य सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या गडचांदूर येथील प्रदूषणाच्या प्रश्नावर मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या उत्तरानंतर आमदार अभिजीत वंजारी यांनी सभागृहात प्रतिप्रश्न उपस्थित करत विषयाची अधिक सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

         वंजारी यांनी सांगितले की, संबंधित माणिकगड सिमेंट कंपनीमुळे निर्माण होणारे प्रदूषण दोन वेगवेगळ्या स्तरांवर आहे. एक म्हणजे सिमेंट उत्पादन प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्री व तांत्रिक प्रक्रियांमुळे होणारे औद्योगिक प्रदूषण, तर दुसरा भाग म्हणजे नागरी घनकचऱ्याच्या साठवणुकीमुळे निर्माण होणारी समस्या.

          घनकचऱ्याबाबत प्रशासनाने नोटिसा दिल्याचे उत्तरात नमूद आहे; मात्र मूळ प्रश्न कंपनीच्या मशिनरीमधून मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या औद्योगिक प्रदूषणाची शासनाने स्वतंत्र दखल घेतली आहे का, संबंधित कंपनीला ‘शोकॉज’ नोटीस देण्यात आली आहे का आणि त्यावर कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी विचारणा त्यांनी केली.

          गडचांदूर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असून औद्योगिक प्रदूषणावर प्रभावी नियंत्रणासाठी शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी सभागृहात केली.