दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडला. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन ‘पोकळ दावे’ असल्याचे म्हणाले.
सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी या अर्थसंकल्पाला ‘केवळ श्रीमंतांसाठी असलेला अर्थसंकल्प’ असे म्हटले आहे.
यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अर्थसंकल्पात SC, ST आणि OBC समाजासाठी कोणत्याही ठोस धोरणात्मक तरतुदींचा किंवा फायद्यांचा उल्लेख नाही. अर्थमंत्र्यांनी केवळ शब्दांचा खेळ केला. तसेच मध्यमवर्गीयांना कर सवलतीची अपेक्षा होती, मात्र त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. वाढत्या महागाईतून सुटका करण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही पावले उचलली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या किमान आधारभूत किमतीला (MSP) कोणतेही कायदेशीर संरक्षण देण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काहीही ठोस नाही, असे आंबेडकर म्हणाले.
आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह…
रुपयाचे घसरते मूल्य आणि भांडवली ओघ (Capital inflows) कमी होणे यांसारख्या गंभीर आर्थिक समस्यांकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांसारख्या बिगर-भाजप शासित राज्यांना त्यांचा योग्य वाटा न देता डावळले आहे असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.



